मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेअर बाजारातील अस्थिरतेच्या वेळी अचानक पैसे काढून घेण्यापासून गुंतवणूकदारांना परावृत्त करण्यासाठी भांडवली बाजार नियामक सेबीने स्विंग प्रायजिंग प्राणाली तयार केली आहे. आता ही प्रणाली एक मार्चऐवजी एक मेपासून लागू होणार आहे. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (सेबी) ने नुकतेच एक परिपत्रक काढले आहे. त्यानुसार, भारतीय म्युच्युअल फंड संघटनेच्या (एम्फी) विनंतीनुसार सेबीकडून स्विंग प्रायजिंग प्रणाली एक मार्चपासून लागू न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सेबीने गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये ओपन एंडेड डेट म्युच्युअल फंड योजनांसाठी स्विंग प्रायजिंग प्रणालीसाठी पुढाकार घेतला होता.
या परिपत्रकानुसार, ही प्रणाली लागू झाल्यानंतर गुंतवणूक करताना आणि पैसे काढताना गुंतवणूकदारांना निव्वळ मालमत्ता मूल्य (एनएव्ही) मिळणार आहे. जे स्विंग फॅक्टर अंतर्गत समायोजित केले जाईल. यामुळे बाजारात जेव्हा अस्थिर परिस्थिती निर्माण होईल, त्यादरम्यान मोठ्या प्रमाणात पैसे काढण्यावर कमी एनएव्ही मिळेल. याचा अर्थ असा आहे की, पैसे काढण्यासाठी अधिक शुल्क द्यावे लागणार आहे. फंडात पैसे कायम ठेवणाऱ्या गुंतवणूकादारांना फायदा होणार आहे. सेबीच्या माहितीनुसार, एखाद्या दबावाच्या परिस्थितीत मोठी रक्कम काढून घेताना फंड व्यवस्थापकाला उच्च दर्जाची आणि तरलता कागदपत्रे विक्री करावे लागतात. यामुळे फंडात कायम राहणाऱ्या गुंतवणूकदारांना कमी दर्जाच्या आणि गैर तरलता कागदपत्रांवर समाधान मानावे लागते. सहाजिकच फंडात कायम राहण्यासाठी गुंतवणूकदारांच्या समोर फंड डिफॉल्ट होण्याची शक्यता असते. अस्थिर परिस्थितीत मोठ्या प्रमाणात रक्कम काढून घेण्यापासून परावृत्त करण्यासाठी ही प्रणाली विकसित केली आहे.
स्विंग प्रायजिंगची ही प्रणाली फक्त अस्थिर वातावरणातच नव्हे, तर सामान्य दिवसांमध्येही लागू राहणार आहे. तथापि, दोन्ही परिस्थितींमध्ये स्विंग घटक वेगळ्या पद्धतीने निर्धारित केला जाईल. स्विंग घटक एक ते दोन टक्क्यांपर्यंत असतील. सामान्य दिवसांमध्ये अंशतः स्विंग लागू होईल. अस्थिर परिस्थितीत बाजारात जास्त जोखीम असलेल्या एंडेड डेट योजनेतून मोठी रक्कम काढून घेणाऱ्या गुंतवणूकदारांना २ टक्के कमी एनएव्ही मिळेल. या प्रणालीत ओव्हरनाइट फंड्स, गिल्ट फंड्स आणि दहा वर्षांच्या परिपक्वता असलेले गिल्ट नसतील. तसेच दोन लाख रुपयांपर्यंत पैसे काढण्यावर स्विंग प्रायजिंग प्रणाली लागू होणार नाही. म्हणजेच लहान गुंतवणूकदार वाटेल तेव्हा पैसे काढू शकणार आहेत. त्यांच्या परताव्यावर स्विंग प्रायजिंगचा परिणाम होणार नाही.