नवी दिल्ली – आपल्याला जर कोणी अॅप्स किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून कर्ज देत असेल तर सावधान राहा कारण आजच्या काळात भारतात बनावट कर्ज देणाऱ्या अॅप्सची संख्या प्रचंड वाढली आहे अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. त्यानुसार भारतात 600 हून अधिक बनावट कर्ज देणारे अॅप आहेत. हे अॅप्स अॅपल अॅप स्टोअर आणि Google Play Store सारख्या प्लॅटफॉर्मवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) शोध अहवालाचा आधार घेत केंद्र सरकारने बनावट अॅप्सचा तपशील उघड केला आहे. त्यामुळे देशातील ऑनलाइन कर्ज देणार्या अॅप्सवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच जानेवारीमध्ये आरबीआयने स्थापन केलेल्या समितीने ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी नोडल एजन्सी स्थापन करण्याची सूचना केली आहे.
सध्या अनेक बनावट अॅप्सवर कारवाई केली जात आहे. या संदर्भात केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितले की, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) 27 बेकायदेशीर कर्ज देणारे अॅप्स ब्लॉक करण्याचे काम केले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने एक पोर्टल स्थापन केले आहे.
येथे करा तक्रार
जानेवारी 2020 ते मार्च 2021 या कालावधीत अशा बनावट अॅप्सच्या 2,562 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ‘Sachet’ पोर्टलवर, बनावट अॅप्सच्या विरोधात तक्रारी RBI कडून कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाच्या रजिस्ट्रार ऑफ एंटिटीजकडे पाठवल्या जातात. तसेच तक्रारदाराच्या राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे पाठवले. 23 डिसेंबर 2020 रोजी, RBI ने लोकांना डिजिटल कर्ज प्लॅटफॉर्म किंवा मोबाईल अॅप्सची फसवणूक टाळण्याचा सल्ला दिला होता.