मुंबई – भारतीय क्रिकेट संघात सध्या सर्व काही सुरळीत असल्याचे चित्र दिसून येत नाहीये. टी-२० चे कर्णधारपद सोडणाऱ्या विराट कोहलीला एकदिवसीय सामन्यांच्या कर्णधारपदावरून हटविण्यात आले. यावरून विराट कोहलीने उघडपणे सर्वांसमोर नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांना खोटे सिद्ध करत विराटने कर्णधारपदावरून हटविण्याबाबत वक्तव्य केले आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी विराटने एका प्रकारे बीसीसीआयलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात बीसीसीआय विरुद्ध विराट कोहली की सौरव गांगुली विरुद्ध विराट कोहली असा सामना पहायला मिळण्याची शक्यता आहे.
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने माध्यमांशी संवाद साधला. विराट म्हणाला, की टी-२० फॉरमॅटचे कर्णधारपद सोडल्यानंतर मला एकदिवसीय आणि कसोटी फॉरमॅटमध्ये कर्णधार होण्याची इच्छा होती. परंतु बीसीसीआयने काहीही न कळवताच मला एकदिवसीयच्या कर्णधारपदावरून हटविले. रोहित शर्माला एकदिवसीय फॉरमॅटचे कर्णधारपद दिल्यानंतरच प्रकरण तापले. विराटच्या या वक्तव्यामुळे अध्यक्ष गांगुली यांना उत्तर देण्यास भाग पाडण्यात आले आहे.
विराट म्हणाला
विराट कोहली म्हणाला, की ८ डिसेंबरला दक्षिण अफ्रिकेच्या दौर्यावर जाणार्या संघाच्या निवडीच्या दीड तासापूर्वी माझ्याशी संपर्क साधण्यात आला. त्यापूर्वी कोणीही माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही. टी-२० चे कर्णधारपद सोडल्यानंतर कोणाशीही बोलणे झाले नाही किंवा कोणीही मला संपर्क केला नाही.
दीड तासापूर्वी कळाले..
मुख्य निवडकर्त्यांनी माझ्याशी कसोटी संघाबाबत चर्चा केली. आम्ही दोघांन्ही यावर सहमती दर्शवली. इतकीच चर्चा झाली. फोन कॉल संपण्यापूर्वी मला सांगण्यात आले की, मी आता एकदिवसीय संघाचा कर्णधार नसेल. मी त्यावर म्हणालो, की ठीक आहे. बस इतकेच बोलणे झाले. त्यापूर्वी माझ्याशी कोणासोबतही चर्चा झाली नाही.
गांगुली म्हणाले…
अध्यक्ष सौरव गांगुली दहा डिसेंबरला एएनआयशी बोलताना म्हणाले, की बीसीसीआय आणि
निवडकर्त्यांनी सहमतीने हा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने विराटला टी-२० प्रमाणेच एकदिवसीय संघाचेही कर्णधारपद सोडवे अशी विनंती केली होती, पंरतु विराटने मान्य केले नाही. दोन मर्यादित षटकांच्या फॉरमॅटसाठी वेगवेगळे कर्णधार नसावे असे सर्व संघ निवडकर्त्यांना वाटले.
कोहलीशी चर्चा
गांगुली म्हणाले की, सर्व चर्चेअंती हा निर्णय घेण्यात आला की, विराट कसोटी संघाच्या कर्णधारपदी कायम राहील आणि रोहित शर्माला मर्यादित षटकांच्या सामन्यांच्या कर्णधारपदाची जबाबदारी द्यावी. मी अध्यक्ष या नात्याने विराट कोहलीशी चर्चा केली होती. तसेच मुख्य निवडकर्त्यांनीही त्याच्याशी चर्चा केली होती.