नवी दिल्ली – टी-२० च्या कर्णधारपदावरून माघार घेतलेल्या विराट कोहलीला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटविण्यावरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरभ गांगुली आणि विराट कोहली यांच्यात शाब्दिक वार सुरूच आहेत. सौरव गांगुली यांच्या वक्तव्याविरुद्ध विराट कोहलीने आपली प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर दोघांमध्ये तणाव वाढला आहे. कोहलीच्या वक्तव्यानंतर बीसीसीआय या प्रकरणाला सांभाळून घेईल असे गांगुली म्हणाले होते. परंतु प्रथमच विराट कोहलीबद्दल गांगुली यांचे वक्तव्य आले आहे.
गुरुग्राममध्ये एका कार्यक्रमादरम्यान गांगुली यांना विचारण्यात आले, की कोणत्या खेळाडूचा दृष्टिकोन त्यांना आवडतो. त्यावर गांगुली म्हणाले की, विराट कोहलीचा दृष्टिकोन चांगला आहे. परंतु तो खूप भांडण करतो. सौरव गांगुली यांना विचारण्यात आले की, जीवनातील चिंतांवर तुम्ही कशी मात करता. त्यावर गांगुली यांनी मजेशीर उत्तर दिले. जीवनात कोणतीच चिंता नाहीये. फक्त पत्नी आणि गर्लडफ्रेंड चिंतेत टाकत असतात, असे ते म्हणाले.
विराट कोहलीने टी-२० विश्वचषकानंतर भारतीय संघाचे कर्णधारपद सोडले. त्यानंतर रोहित शर्माला नेतृत्व देण्यात आले होते. एकदिवसीय संघासाठी कर्णधार राहणार असल्याचे विराट म्हणाला होता. परंतु दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय कसोटी संघाच्या घोषणेच्या दिवशीच विराटला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटविले होते.
त्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांचे वक्तव्य आले. ते म्हणाले, की विराटला टी-२० संघाचे कर्णधारपद न सोडण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यावर कर्णधारपद सोडण्याबद्दल बीसीसीआयकडून मला कोणीही काही सांगितले नाही. तसेच एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटविण्याच्या दीड तासापूर्वी सांगण्यात आले होते. त्यावर ओके अशी प्रतिक्रिया विराट कोहलीने दिली होती. कोहलीच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता.