नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारताचा आजवरचा सर्वात यशस्वी कर्णधार असा विराट कोहलीचा उल्लेख केला जातो. म्हणूनच तो क्रिकेट शौकीनांच्या गळ्यातील ताईत ठरला आहे. पण, याच विराटला अचानक कर्णधारपदावरून हटविण्यात आले. अवघ्या क्रिकेटविश्वासाठीच तो धक्का होता. त्याच्या चाहत्यांनी उघडपणे नारजीही बोलून दाखविली होती. पण, त्याला कर्णधारपदावरून का हटविण्यात आले होते. यासर्वामागे असणाऱ्या मास्टरमाईंडचे नावसुद्धा समोर आले आहे. बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनीच हे नाव समोर आणले आहे.
८ डिसेंबर २०२१ रोजी चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने संघाची घोषणा केली होती. यामध्ये विराट कोहली कसोटी संघाचा कर्णधार होता, पण एकदिवसीय संघाच्या कर्णधार पदावरून त्याला हटवले होते. विराटच्या जागी रोहितला कर्णधारपद दिले होते. संघ जाहीर करण्याच्या दीड तास आधी आपल्याला कर्णधार पदावरून हटवले आहे, याची माहिती विराटला देण्यात आली. याचा खुलासा कोहलीने एका पत्रकार परिषदेतून केला होता.
सौरव गांगूली कारणीभूत
आघाडीच्या दूरचित्र वाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून क्रिकेट विश्वाशी संबंधित अनेक खुलासे समोर आले आहे. या स्टिंग ऑपरेशनदरम्यान चेतन शर्मा यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. विराट कोहलीला कर्णधार पदावरून कसे हटवण्यात आले, याच्या मागील पार्श्वभूमीही सांगितली आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्याबरोबर विराट कोहलीचा वाद होता. या वादातूनच विराटला कर्णधार पदावरून काढण्यात आल्याचा दावा चेतन शर्मा यांनी स्टिंग ऑपरेशनमध्ये केला आहे. कोहली आणि गांगुली यांच्यात अहंकाराचा वाद होता. स्वत:चे कर्तृत्व क्रिकेटपेक्षा मोठे आहे, असे विराटला वाटत होते. यामुळे दोघांमध्ये वादाला सुरुवात झाल्याचेही शर्मा यांचे म्हणणे आहे.
विराट-रोहितमध्ये वाद नाही
चेतन शर्मा यांनी स्टिंग ऑपरेशनमध्ये विराट आणि रोहित यांच्यातील संबंधावर भाष्य केले. दोघांमध्ये कसलाही वाद नसून विराट आणि रोहित दोघं एकमेकांना चांगली साथ देतात. दोघांत वाद असल्याच्या चुकीच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येतात. पण विराटचा फॉर्म खराब असताना रोहितने त्याला चांगली साथ दिली होती. तर रोहितचा फॉर्म खराब असताना विराटही त्याला साथ देत होता, असा दावा चेतन शर्मा यांनी केला आहे.
BCCI Virat Kohli Captaincy Sting Operation Master Mind