इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी एक ट्विट करून एकच गोंधळाचे वातावरण निर्माण केले. सौरव गांगुली यांनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट लिहिली. त्यामुळे ते बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार की काय अशी चर्चा सुरू झाली. मात्र या सर्व गोंधळानंतर आपण पदाचा राजीनामा दिलेला नाही आणि तसे करण्याचा कोणताही विचार नाही. मी एका नव्या जागतिक शैक्षणिक अॅपचे अनावरण करणार आहे, असे स्पष्टीकरण देऊन त्यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे.
बीसीसीआय अध्यक्ष गांगुली यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यानुसार, “मी असे काही सुरू करण्याचे नियोजन करत आहे. ज्यामुळे बहुतेक अनेकांना मदत होणार आहे.” त्यानंतर गांगुली पदाचा राजीनामा देणार अशी चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, सौरव गांगुली यांनी राजीनामा दिला नसल्याच्या वृत्ताला बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी यापूर्वी दुजोरा दिला होता.
जय शाह यांनी एएनआय वृत्तसंस्थेला याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते सांगतात, “सौरव गांगुली हे बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत आणि ते पदावर कायम राहणार आहेत. त्यांनी राजीनामा दिल्याची अफवा सगळीकडे पसरली आहे. परंतु हे वृत्त पूर्णपणे चुकीचे आहे. आमच्याकडे माध्यमांच्या हक्कांबद्दल काही उत्साहित करणाऱ्या गोष्टी येणार आहेत. माझ्यासोबत जे काम करत आहेत, त्यांच्यासमोरील आव्हानांवर माझे लक्ष केंद्रित आहे. भारतीय क्रिकेट सुरक्षित ठेवण्यावर आमचे लक्ष आहे.”