इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताने जोरदार खेळाचे प्रदर्शन करत पाकिस्तानचा पाच गडी आणि दोन चेंडू राखून पराभव करत विजयी सुरुवात केली. हा सामना संपल्यानंतर मात्र वेगळ्याच कारणाने चर्चा सुरु झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र जय शाह सुद्धा उपस्थित होते. एका व्हीडिओमध्ये त्यांनी भारतीय तिरंगा पकडण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर आक्षेप घेण्यात येत आहे.
भारत – पाकिस्तान सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजीच्या आघाडीवर जबरदस्त चुरस दिसून आली. सामन्यातील घडामोडींबरोबरच या सामन्यासाठी उपस्थित असलेल्या व्यक्तींसंदर्भातही सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु आहे. यामध्ये जय शाह यांचाही समावेश आहे. दुबईमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर सुरु असणाऱ्या सामन्यादरम्यान जय शाह काही स्थानिक अधिकाऱ्यांसोबत सामना पाहत असल्याचे सामन्यातील मध्यंतरापर्यंत अनेकदा दिसून आले. सामन्याच्या उत्तरार्धामध्ये शाह हे भारतीय फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीवर आनंद व्यक्त करतानाही दिसले. मात्र सामना जिंकल्यानंतर जय शाह यांनी भारतीय झेंडा हातात पकडण्यास नकार दिल्याचे दृष्य कॅमेरामध्ये कैद झाले आणि या मुद्द्यावरुन काही दाक्षिणात्य नेत्यांनी आक्षेप घेत शाह यांच्यावर टीका केली. त्यानंतर सोशल मीडियावर याचे जोरदार पडसाद उमटण्यास सुरुवात झाली.
सामना संपल्यानंतर सर्वांनी एकच जल्लोष केला. यामध्ये जय शाहदेखील जल्लोष करत टाळ्या वाजवत होते. त्याचवेळी त्यांच्या शेजारी असणाऱ्या एका सहकाऱ्याने त्यांच्या हातात तिरंगा देऊ केला. मात्र शाह यांनी ‘नो’ म्हणत तिरंगा हातात घेण्यास नकार दिला आणि ते टाळ्या वाजवत राहिले. हा सर्व घटनाक्रम मैदानातील कॅमेरांमध्ये कैद झाला आणि थेट प्रक्षेपणामध्येही दिसला.
आता याच मुद्द्यावरुन तेलंगण राष्ट्र समितीचे सोशल मीडिया प्रमुख असणाऱ्या कृष्णन् यांनी ट्विटरवरुन नाराजी व्यक्त करताना हे कृत्य भाजपा पक्षाशी संबंधित नसणाऱ्या नेत्याने केलं असतं तर काय झालं असतं अशा आशयाचं ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी “जर ही गोष्ट भाजपाशी संबंधित नसलेल्या नेत्याने केली असती, त्याने तिरंगा हातात धरण्यास नकार दिला असता तर संपूर्ण भाजपाच्या आयटी विंगने त्या व्यक्तीला देशद्रोही म्हटलं असतं. तसेच गोदी मिडीयाने दिवसभर यावर चर्चासत्र आयोजित केलं असतं. मात्र नशिबाने ही व्यक्ती शेहेनशाह यांचे पुत्र जय शाह आहेत”, असं कृष्णन् यांनी व्हिडीओची क्लिप पोस्ट करत म्हणलं आहे.
https://twitter.com/krishanKTRS/status/1563956536279711744?s=20&t=92YDfuAYjVqXqCi4Ll3j2Q
BCCI Jay Shah Video Viral Indian Flag
Tricolor Secretary India Pakistan Match Asia Cup