मुंबई – भारताची द वॉल अशी बिरुदावली लावली जाणारा फलंदाज राहुल द्रविड भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळण्यास तयार झाला आहे. श्रीलंकामध्ये नुकत्याच झालेल्या मर्यादित षटकांच्या सामन्यात भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची राहुल द्रविडनेच जबाबदारी सांभाळली होती. सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाल टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर समाप्त होत आहे. त्यानंतर द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होईल. टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध २४ ऑक्टोबरला होणार आहे. विराट कोहलीनेसुद्धा टी-२० विश्वचषकानंतर टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाची घोषणा यापूर्वीच केली आहे.
एएनआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, द्रविडने मुख्य प्रशिक्षक होण्यास सहमती दर्शविली आहे. यापेक्षा अधिक चांगले काहीच होऊ शकत नाही, असे त्याने सांगितले. फलंदाजीच्या प्रशिक्षकपदावर विक्रम कायम राहणार आहेत. त्याशिवाय इतर पदावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. भारतीय क्रिकेट संघ आता बदलाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. संघामध्ये अनेक युवा खेळाडूंचा भरणा केला जाणार आहे. हे सर्व खेळाडू द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळले आहेत. भारतीय संघासाठी ही खूपच महत्त्वाची बाब ठरणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल द्रविड हा नेहमीच बीसीसीआयचा आवडता उमेदवार राहिला आहे. बीसीसीआय सचिव जय शाह आणि अध्यक्ष सौरव गांगुली यांनी द्रविडसोबत चर्चा केली आहे. राहुल द्रविडने भारतीय क्रिकेट संघाच्या हिताला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सर्व गोष्टी खूपच सोप्या झाल्या आहेत. राहुल द्रविडसारख्या खेळाडूचे भारतीय संघाला मार्गदर्शन लाभल्यास त्याचा निश्चितच लाभ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय क्रिकट संघ हा जगातील अत्यंत महत्त्वाचा आणि धनवान क्रिकेट संघ समजला जातो. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळणाऱ्या राहुल द्रविडला तब्बल १० कोटी रुपये मानधन मिळणार आहे. भारतीय क्रिकेट संघाला आजवर जेवढे प्रशिक्षक लाभले त्यांच्यामध्ये हे सर्वाधिक मानधन राहणार असल्याचे सांगितले जात आहे.