विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
पुढील महिन्यात भारतीय क्रिकेट संघात अनेक बदल मोठे दिसू शकतात. एकीकडे विराट कोहली मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून कर्णधारपदाचा राजीनामा देण्याची शक्यता असून त्याच्या जागी रोहित शर्माला कर्णधार बनवण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री गेल्यानंतर राहूल द्रविडला भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले जाऊ शकते.
माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी एका निवेदनाद्वारे संकेत दिले आहेत की, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्यानंतर द्रविडला हे पद सोपवले जाईल. मात्र द्रविडला तात्पुरते संघाचे प्रशिक्षक बनवले जाऊ शकते. तसेच गांगुलीने असेही म्हटले की, प्रशिक्षकपदा बाबत मी राहुल द्रविडशी बोललो नाही. मला समजले की राहुल द्रविडला कायमस्वरूपी प्रशिक्षकपदासाठी काम करण्यात रस नाही. तथापि, आम्ही देखील त्याच्याशी याबद्दल कधीही बोललो नाही.
मुख्य प्रशिक्षक शास्त्री यांचा कार्यकाळ केवळ टी -20 विश्वचषकापर्यंत आहे आणि त्यानंतर त्यांचा कार्यकाळ संपेल. याबाबत शास्त्रींनी अनेकवेळा असेही म्हटले आहे की त्यांचा करार वाढवण्याच्या मनःस्थितीत नाही. शास्त्रींचा कार्यकाळ संपल्यानंतर द्रविड भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतील, अशा बातम्या माध्यमांमध्ये होत्या. तथापि, द्रविडने आधीच स्पष्ट केले आहे की, तो भारतीय संघाचा पुढील प्रशिक्षक होणार नाही.