इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाने केलेली कारवाई पूर्ण झाली आहे. यामध्ये बीबीसीने करचोरी केल्याची माहिती आयकर विभागाने जाहीर केली आहे.
बीबीसीवरील कारवाई अंतर्गत आयकर विभागाचे सर्वेक्षण तीन दिवस चालले. सर्वेक्षणादरम्यान बीबीसी ग्रुपने कमी उत्पन्न दाखवून कर वाचवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. आयकर विभागाने म्हटले की, सर्वेक्षणातून असेही दिसून आले आहे की, विविध भारतीय भाषांमध्ये (इंग्रजी व्यतिरिक्त) कंटेटचा पुरेसा वापर असूनही, समूहाने दाखवलेले उत्पन्न किंवा नफा कामकाजाच्या प्रमाणाशी सुसंगत नसल्याचे म्हटले आहे.
कर्मचाऱ्यांची विधाने, डिजिटल पुराव्यावर आधारित खुलासेसर्वेक्षणादरम्यान बीबीसीच्या ऑपरेशनशी संबंधित विभागाने गोळा केलेले पुरावे हे स्पष्टपणे दर्शवतात की, बीबीसीच्या परदेशी युनिट्सद्वारे नफ्याचे अनेक स्त्रोत होते, ज्यावर भारतातील कर भरला गेला नाही. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, परदेशात आणि देशात असे अनेक कर्मचारी आहेत, ज्यांचे पेमेंट भारतीय युनिटने केले होते आणि त्यावर कर भरला नाही. बीबीसी कर्मचाऱ्यांचे स्टेटमेंट, डिजिटल पुरावे आणि कागदपत्रांच्या आधारे ही सर्व आर्थिक अनियमितता उघड झाली आहे.
तापलेय राजकारण
‘बीबीसी’वरील कारवाईमुळे राजकारण तापले आहे. विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सूडबुद्धीने झालेली ही कारवाई अनपेक्षित नव्हती, या सरकारचा विनाशकाळ नजीक आल्याची टीका काँग्रेस व तृणमूल काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी केली. ‘बीबीसी’ने ‘इंडिया : द मोदी प्रश्न’ हा गुजरात दंगलीसंदर्भातील वृत्तपट प्रदर्शित केला होता व तत्कालीन मोदी सरकारवर ताशेरे ओढले होते. या वृत्तपटावर केंद्राने बंदी घातली असून यूटय़ूब आणि ट्विटरला या माहितीपटाची लिंक काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.
BBC Offices Search Operation Income Tax Dept