हिंगोली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्ह्यातील आदर्श शाळेमध्ये मुलांना व्यावहारिक ज्ञान मिळण्यासाठी दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी बाजार हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून ही बाजाराची संकल्पना संपूर्ण राज्यात राबवणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी आज शिक्षण विभागाची आढावा बैठक घेतली. त्यावेळी बोलत होते. यावेळी आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, संदीप सोनटक्के, डायटचे प्राचार्य भानुदास पुटवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्ह्यातील शिक्षकांच्या अडचणी प्राधान्याने सोडवून त्या तात्काळ मार्गी लावाव्यात. सर्व भाषेच्या शाळेत मराठी भाषा शिकविणे बंधनकारक आहे. तसेच राष्ट्रगीत, राज्यगीत अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. याची जबाबदारी सर्वांची असून संबंधित अधिकाऱ्यांनी पडताळणी करावी. राज्यातील सर्व शाळांनी शाळा प्रवेशाचा उपक्रम उत्कृष्टपणे राबवला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत गोरगरिबांची मुले शिकत आहेत. त्यामुळे त्यांना शाळेत भौतिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात. यासाठी शासन सकारात्मक आहे. पुणे येथे झालेल्या दोन दिवशीय कार्यशाळेत मांडलेल्या अडचणी प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. शासन शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी झुकते माप देत आहे. जिल्हा प्रशासनानेही जिल्हा वार्षिक व इतर निधीतून शाळेत शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, क्रीडांगण, रंगरंगोटी, वाचनालय, सुरक्षा भिंत यासह विविध भौतिक सुविधा उपलब्ध करुन जिल्ह्यात आदर्श शाळा निर्माण कराव्यात. सर्वांना सोबत घेऊन व लोकसहभाग घेऊन शाळेचा विकास करावा. तसेच माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य घ्यावे. यासाठी प्रत्येक दिवाळीत स्नेहसंमेलन आयोजित करुन त्यामध्ये गावातील नागरिक, पालक व माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित करावे, अशा सूचना शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी दिल्या.
जिल्हा परिषदेच्या शाळेत गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण देण्यासाठी निपुण महाराष्ट्र व राष्ट्रीय शिक्षण अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी. येथील विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी त्यांना व्यावसायिक शिक्षण देण्याची गरज आहे. हिंगोली येथे मुलांना शेतीची माहिती होण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतावर सहली न्याव्यात. तसेच बँक, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद येथील कामकाजाची माहिती देण्यासाठी एक दिवसाची सहल नेण्याचा उपक्रम राबवावा. कल्पक शिक्षकांची बँक तयार करावी. येत्या काळात समितीच्या अध्यक्षासोबत बोलणार आहे. त्यासाठी शालेय समित्या गठीत कराव्यात आणि त्याचा विदा उपलब्ध करुन द्यावा. शाळेतील मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे देण्यासाठी महिलांची टीम तयार करण्यात येणार आहे. पुढील वर्षापासून गुणवत्ता सुधारण्यासाठी चौथी आणि सातवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती अभियानांतर्गत उत्तम दर्जाचे अन्न द्यावे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. त्यामुळे शिक्षकांनी या मुलांना प्रोत्साहन देत गांभीर्यपूर्वक योगदान द्यावेत. गावात प्रतिकूल परिस्थितीत विपरीत घटना झाल्यास त्या कुटुंबियाच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट घ्यावी. तसेच येत्या 26 जानेवारीला देशभक्तीपर गीतांचा व कवायतीचा कार्यक्रम घ्यावा. याची तयारी आतापासूनच करावी, अशा सूचना शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिल्या.
यावेळी हिंगोली तालुक्यातील इडोळी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील उपक्रमाची माहिती राजेश्वर पवार यांनी, मार्लापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमाची माहिती अरुण बैस यांनी तर गणेशवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील राबविण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती कुलदीप मास्ट या शिक्षकांनी दिली. या तीनही शाळेतील राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी कौतुक करुन त्यांचा सन्मान केला.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्ह्यात 10 आदर्श शाळा निर्माण करण्यात येणार असून त्यासाठी वास्तू विशारदाकडून कामाचे डिझाईन तयार करुन त्याचे काम करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात निपुण 2.0 अंतर्गत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी वर्षातून चार शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहेत. तसेच 30 तासात मुलांना इंग्रजी शिकण्यासाठी अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. याचा वेळोवेळी आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली. या बैठकीस सर्व गट शिक्षणाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक उपस्थित होते.