मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मान्सून येईपर्यंत सारे चातकासारखे वाट बघत होते. मान्सून आल्यावरच थोडे दिवस दिलासा मिळाला. त्यानंतर मुसळधार पावसामुळे पिकांची नासाडी सुरू झाली, गावांमध्ये पूर आला, शेकडोंचे जीव गेले. आता जरा शांतता लाभेल असे वाटत असतानाच हवामान खात्याने राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कारण, बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळाची निर्मिती होत आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. राज्यात बऱ्यापैकी पाऊस येऊन गेला आहे. मॉन्सूनने सरासरी गाठलेली आहे. पण काही जिल्ह्यांना मोठा फटका बसला. रायगड जिल्ह्यात पावसाने माजवलेला हाहाकार साऱ्यांनी बघितला. अजूनही त्याठिकाणी मदतकार्य सुरू आहे. ५०हून अधिक लोक बेपत्ता आहेत. अशात पुन्हा एकदा रायगडसह पुणे, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांना बुधवारी रेड अलर्ट जारी करण्यात आले आहे. तर मुंबई सुद्धा अॉरेंज अलर्टच्या कक्षेत असून इथेही अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बुधवारी (२६ जुलै) मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नांदेड, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांना अॉरेंज अलर्ट देण्यात आला आहे. २७ जुलैला पुण्याला रेड अलर्ट जारी करण्यात आले आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांना गुरुवारी अॉरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भावर दुबार पेरणीची वेळ
गेल्या आठवड्यात विदर्भात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. अशात हवामान खात्याने गुरुवारी विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये अॉरेंज अलर्ट जारी केले आहे. वर्धा, यवतमाळ, नागपूर, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांमध्ये गुरुवारी मुसळधार पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.