इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गेल्या ३० वर्षांपासून किमान १० हजार महिलांचे आंघोळ करतानाचे फोटो काढण्यात आल्याची धक्कादायक प्रकार जपानमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी जपानी पोलिसांनी १७ जणांना अटक केली आहे. हे मोठे रॅकेट होते. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार करिन सायटोला डिसेंबर २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्या माहितीवरुन आता तब्बल १७ जणांना अटक झाली आहे.
डॉक्टरांपासून ते अधिकाऱ्यापर्यंत
असाही शिंबून या वृत्तपत्राने म्हटले आहे की, सायटोसमोर डझनभराहून अधिक पुरुषांची ओळख परेड करण्यात आली. त्यानंतर शिझुओका प्रीफेक्चरमधील पोलिसांनी १६ पुरुषांना अटक केली. त्यांनी सांगितले की गरम पाण्याच्या झऱ्याच्या ठिकाणी आंघोळ करणाऱ्या महिलांचे फोटो आणि व्हिडिओ काढले जायचेय अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक सरकारी अधिकारी आणि टोकियो येथील एका डॉक्टरचा समावेश आहे. सर्व आरोपींवर बेकायदेशीर फोटोग्राफी आणि पोर्नोग्राफी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. या सर्वांवर चाइल्ड पोर्नोग्राफी कायद्याचे उल्लंघन केल्याचाही आरोप आहे.
असे होते रॅकेट
करिन सायटो (वय ५०) याने अधिकार्यांना सांगितले की, जेव्हा तो २० वर्षांचा होता. तेव्हा त्याने हॉट स्प्रिंग्समध्ये महिलांचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. अटक केलेल्या उर्वरित पुरुषांनी सायटोपासून महिलांचे चित्रीकरण करण्याचे तंत्र शिकले आणि किमान १० हजार महिलांचे चित्रीकरण करण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर केला. आरोपींनी किमान १०० ठिकाणी महिलांचे व्हिडिओ बनवले. ते कित्येकशे मीटर दूर डोंगरात लपून बसायचे आणि गरम पाण्याच्या झऱ्यांमधील महिलांचे फोटो आणि व्हिडिओ काढायचे.
Bathing Women Photo Shoot 17 Arrested Big Racket