अतिशय दुर्दैवी…
गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बाथरूममध्ये आंघोळीसाठी काढलेल्या गरम पाण्याच्या टबमध्ये पडल्याने अडिच वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. ही घटना जयभवानी रोड भागात घडली.
गेली नऊ दिवस भाजलेल्या चिमुरडीवर आडगाव येथील मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू होते. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
किर्तीका आकाश गिरी (२ वर्ष ३ महिने रा. आवटेमळा, जयभवानीरोड) असे मृत बालिकेचे नाव आहे. ही घटना २६ आॅक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली होती.
किर्तीका गिरी हिस आंघोळ घालण्यासाठी बांथरूममधील टब मध्ये गरम पाणी काढण्यात आले होते. तिची आई टावेल घेण्यासाठी काही अंतरावर गेली असता ही घटना घडली होती. खेळता खेळता किर्तीका गरम पाण्याने भरलेल्या टब मध्ये पडली होती.
या घटनेत गंभीर भाजल्याने वडिल आकाश गिरी यांनी जिल्हारूग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ आडगाव येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले होते. गेली नऊ दिवस ती मृत्यूशी झुंज देत होते. अखेर बुधवारी (दि.५) सायंकाळी तिची प्राणज्योत मालवली.
उपचार सुरू असतांना डॉ. पारस शहा यानी तिला मयत घोषीत केले असून याबाबत डॉ. सलोनी पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास जमादार साळवे करीत आहेत.
शहरात आत्महत्येचे सत्र सुरूच
शहरात आत्महत्येची मालिका सुरूच असून बुधवारी (दि.५) वेगवेगळ््या भागात राहणाºया दोघानी आत्महत्या केली. त्यातील विवाहीतेने विषारी औषध सेवन करून तर २६ वर्षीय तरूणाने गळफास लावून घेत आपले जीवन संपविले. दोघांच्याही आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी गंगापूर आणि म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
सातपूर औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात राहणाºया इश्वर मनोहर बोरसे (२६ रा.इंदिरागांधी शाळेजवळ) या युवकाने बुधवारी रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात छताच्या लोखंडी कडीस साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच विजय लहारे यांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले.
वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार ढमाले करीत आहेत.
दुसरी घटना म्हसरूळ येथील हरिहरनगर भागात घडली. साक्षी उर्फ जयश्री गोपीनाथ तांबेकर उर्फ जयश्री प्रवीण बेंडककुळे (२१ रा. विष्णुचरण सोसा. बजाज शो रूममागे हरिहरनगर) या विवाहीतेने गेल्या सोमवारी (दि.३) रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात हमला नावाचे विषारी औषध सेवन केले होते.
ही बाब निदर्शनास येताच पती प्रविण बेंंडकुळे यांनी तिला तात्काळ प्रथम लिलावती व नंतर बिरसामुंडा हॉस्पिटल येथे दाखल केले होते. बुधवारी रात्री उपचार सुरू असतांना डॉ. राजेंद्र चौधरी यांनी तिला तपासून मृत घोषीत केले. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.
रिक्षाचालकाने केला महिलेचा विनयभंग
अश्लिल भाषा वापरल्याचा जाब विचारल्याने रिक्षाचालकाने महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार सिडको भागात घडला. या घटनेत भररस्त्यात शिवीगाळ करीत संशयित मारण्यासाठी अंगावर धावून गेल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजिम सत्तार सय्यद (रा.बागवानपुरा जुने नाशिक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित रिक्षाचालकाचे नाव आहे. पिडीतेने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी (दि.५) सकाळच्या सुमारास हा प्रकार घडला.
सुविधा हॉस्पिटल परिसरात पिडीता बसची प्रतिक्षा करीत असतांना शेजारी रिक्षा पार्क करून उभ्या असलेल्या संशयिताने तिच्याशी अश्लिल भाषा वापरली.
यावेळी महिलेने जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने विनयभंग करीत तिला शिवीगाळ केली. तसेच भररस्त्यात अंगावर धावून जात महिलेस मारहाण करण्याचा प्रयत्न केला. अधिक तपास हवालदार आवारे करीत आहेत.







