मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी स्मारकाचे व्यवस्थापन, देखभाल, सुरक्षा व इतर आवश्यक कामकाजाची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी पुणे यांच्याकडे हस्तांतरित करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुक्तीभूमी स्मारक अधिक लोकाभिमुख होऊन या स्मारकाच्या विकासाला चालना मिळणार आहे.
१३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक धर्मांतराची घोषणा केली होती. या ऐतिहासिक घटनेमुळे येवला ही जागा ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी या स्थळाचा टप्पा एक व टप्पा दोन अंतर्गत सुमारे ३० कोटींहून अधिक निधीतून परिपूर्ण असा विकास केला आहे. या स्मारकाची देखभाल दुरुस्ती ही बार्टीने करावी यासाठी मंत्री छगन भुजबळ यांचा पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून येवला मुक्तीभूमी स्मारक देखभालीसाठी व विकासासाठी बार्टी संस्थेकडे हस्तांतरित करण्याचा आज निर्णय घेण्यात आला आहे.
मुक्तीभूमीच्या ऐतिहासिक व प्रेरणादायी वारशाचे जतन व संवर्धन करण्यासाठी, तसेच स्मारक परिसराचा अधिक विकास साधण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हे स्मारक हस्तांतर केल्यामुळे स्मारकाचे शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व वाढविण्यास मदत होणार आहे. या निर्णयानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी स्मारकाचे वास्तु व्यवस्थापन, देखभाल, सुरक्षा आणि संबंधित सर्व कामकाजाची जबाबदारी बार्टी, पुणे यांच्याकडे असेल.
सदर स्मारकाचे देखभाल, संवर्धन व विकासासाठी आवश्यक निधी व साधनसामग्रीची तरतूद शासनामार्फत करण्यात येईल.
या निर्णयामुळे येवला मुक्तीभूमी स्मारकाचा लौकिक वाढेल, तसेच भावी पिढ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक कार्याची प्रेरणा देण्यासाठी स्मारकाचा उपयोग अधिक प्रभावीपणे केला जाईल, असा विश्वास मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.