सुरगाणा – तालुक्यातील बाऱ्हे गावातील ग्रामीण रुग्णालयाला खासदार डॉ. भारती पवार यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली असता अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. बाऱ्हे येथील नागरिकांच्या अनेक तक्रारी ह्या रुग्णालयाबाबत प्राप्त झाल्या होत्या. येथील रुग्णालयात रुग्णांना व्यवस्थित उपचार केले जात नाही, त्यांच्या सोबत अरेरावीच्या भाषेत बोलले जाते, औषधे बाहेरून आणायला सांगितले जाते, पेशंट ऍडमिट करून घेतले जात नाही, रात्रीच्या वेळी तिथे परिचारिका व डॉक्टर्स उपलब्ध नसतात, रुग्णवाहिका मिळत नसल्याने गंभीर रुग्णाला खाजगी वाहनाने उपचारासाठी अन्य ठिकाणी घेऊन जावे लागते, अशा असंख्य तक्रारी होत्या.
या सर्व गोष्टींची शहानिशा करण्यासाठी डॉ. पवारांनी बाऱ्हे येथील सरकारी रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली. तेथे अनेक गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या. ड्युटी असूनही काही कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती होती, रोजच्या सह्यांच्या मस्टर मध्ये अनेक अपूर्तता आढळून आल्या, तपासलेल्या अनेक रुग्णांचा डेटा व्यवस्थीत भरला गेला नसल्याचे दिसून आले. तिथे रुग्ण उपचारासाठी ऍडमिट करून घेण्याची सुविधा असतांनाही एकही रुग्ण तिथे ऍडमिट नसल्याचे समोर आले परंतु कागदोपत्री तिथे पेशंट ऍडमिट दाखवण्यात आले असल्याचे दिसून आले. औषध भांडारण येथील बोर्डवर रोजचा किती औषध साठा उपलब्ध आहे हेही नमूद करण्यात आले नव्हते. तेथे तापसलेल्या अनेक रुग्णांची माहिती घेतली असता त्यांनी आपल्या नोंदवही मध्ये रुग्णांच्या आजाराविषयी स्पष्टपणे नोंद केली नसल्याचे समोर आले. त्यातून अनेक रुग्ण हे त्यांच्या लक्षणांवरून कोव्हीड पॉझिटिव्ह असू शकतात अश्या रुग्णांनाही त्यांची खातरजमा न करता सोडून देण्यात आले. ही अतिशय गंभीर बाब समोर आली असून असा हलगर्जीपणा किती अंगलट येऊ शकतो, याची कल्पनाच केली जाऊ शकत नसल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.
ह्या गोष्टींची गंभीर दखल घ्यावी. आदिवासी, सर्वसामान्य गरीब रुग्णांना सरकारी आरोग्य केंद्रात योग्य ते उपचार मिळत नसतील, त्यांच्याशी कर्मचाऱ्यांची वागणूक नीट नसेल तर त्यांनी दाद तरी कोणाकडे व कशी मागायची असा संतप्त सवालही डॉ. पवार यांनी केला. आपण लवकरच ह्या सर्व गोष्टींची तक्रार करणार असून त्याची योग्य दखल घेऊन सबंधित दोषींवर कडक कार्यवाही करण्याची मागणी करणार असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.