इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बारामतीमध्ये पहिल्यांदा पवार कुटुंबियांचा दिवाळी पाडवा वेगवेगळ्या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे. गोविंद बागेत शरद पवारांचा तर काटेवाडीत अजित पवारांचा हा दिवाळी पाडवा आयोजित करण्यात आला आहे. दोन्ही ठिकाणी कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे.
राष्ट्रवादीत फुट फडल्यानंतर त्याचे पडसाद पवार कुटुंबियांवरही पडले. लोकसभेत सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार एकमेकांविरुध्द उभ्या राहिल्या. त्यावेळेसही आरोप – प्रत्यारोप झाले. पण, या निवडणुकीनंतर पवार कुटुंबिय सण एकत्र साजरे करतील असे सर्वांना वाटत होते. पण, आज पवार कुटुंबियांचे दोन वेगवेगळे पाडवा मेळावा झाले.
विधानसभा निवडणुकीत बारामतीमधून अजित पवार विरुध्द त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार हे त्यांच्याविरुध्द उभे आहे. त्यामुळे पवार कुटुंबियांतील संघर्ष पुन्हा पेटला आहे. त्यामुळे पहिल्यांदा दोन दिवाळी पाडवा वेगवेगळ्या ठिकाणी साजरे केले जात आहे.
गोविंदबागेतील दिवाळी पाडव्यात शरद पवार यांच्याबरोबर खासदार सुप्रिया सुळे व युगेंद्र पवार हे होते. तर दुसरीकडे अजित पवारांबरोबर सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार हे होते. आमदार रोहित पवार हे मतदार संघात प्रचारात असल्यामुळे ते उपस्थिती नव्हते.