नवी दिल्ली – दिल्ली उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष राजीव खोसला याला १९९४ मध्ये एका महिला वकिलाला मारहाण केल्या प्रकरणी दिल्लीतील एका न्यायालयाने ४० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. या वेळी शेकडो वकील उपस्थित होते. हा निर्णय ऐकण्यासाठी अनेक वकील खुर्च्या आणि बाकांवर चढले होते. यादरम्यान वकील एकता झिंदाबाद आणि राजीव खोसला झिंदाबाद अशा घोषणा देऊन आनंद व्यक्त करण्यात आला.
पीटीआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, या प्रकरणी राजीव खोसलाला दोषी ठरविण्यात आले होते. खोसलाला कलम ३२३ (दुखापत करणे) आणि ५०६ (धमकी देणे) अंतर्गत दोषी ठरविण्यात आले. तक्रारदार सुजाता कोहली यांच्या आरोपानुसार, ऑगस्ट १९९४ रोजी खोसलाने त्यांचे केस ओढून फरपटत नेले होते. या कलमांतर्गत दोन वर्षांपर्यंतची कैद होण्याची तरतूद आहे. परंतु खोसलाला फक्त दंड सुनावण्यात आला आहे. कोहली या त्यादरम्यान तीस हजारी न्यायालयात वकील म्हणून काम करत होत्या. त्यानंतर दिल्लीतील एका न्यायालयात त्या न्यायाधीश झाल्या. गेल्या वर्षी त्या जिल्हा आणि सत्र न्यायधीश बनून सेवानिवृत्त झाल्या होत्या.
मुख्य महानगर न्यायमूर्ती गजेंद्र सिंह नागर यांच्या आदेशानुसार, कलम ३२३ अंतर्गत खोसला याला एका महिन्याच्या आत राज्याला आणि पीडितेला दहा -दहा हजार रुपयांची भरपाई द्यावी लागेल. कलम ५०६ अंतर्गत त्याला राज्य आणि पीडितेला २० हजारांची भरपाई द्यावी लागेल. आदेश सुनावण्यापूर्वी वकिलांनी घोषणाबाजी केली. न्यायाधीश दबावात काम करत असल्याचा आरोप वकिलांनी केला. या वेळी न्यायालयाबाहेर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या सुनावणीत कोहली म्हणाल्या की, निर्णयानंतर खोसलाने न्यायालय आणि न्यायाधीशांविरुद्ध असंसदीय भाषेचा वापर केला. आरोपी खोसला याला गर्दीसह न्यायालयात प्रवेश करण्याची परवानगी कशी देण्यात आली? तो येथे शेकडो वकिलांसोबत आला आहे. दोषी सारखे हेच दर्शवत होता की त्याच्या मनात कायद्याच्या शासनाबद्दल कोणताच सन्मान नाही. तो न्यायालयाला नेहमीच शिव्या देणे पसंत करतो.