मुंबई – बँक आणि विमा कंपन्यांकडे असलेले हजारो कोटी रुपये वर्षानुवर्षे कुणीच काढलेले नाहीत. त्यामुळे या पैश्यांचा वाली कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भविष्य निर्वाह निधी, बँका आणि विमा कंपन्या यांच्याकडे बेवारस पडून असलेली रक्कम ऐकली तर तुमच्याही भूवया उंचावतील. तब्बल ४९ हजार कोटी रुपये बँका आणि विमा कंपन्यांच्या बेवारस खात्यांमध्ये पडून असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
केंद्रीय अर्थ राज्य मंत्री भागवत कराड यांनी राज्यसभेत अलीकडेच सांगितले की, गेल्या वर्षी ३१ डिसेंबरपर्यंत बँकांकडे २४ हजार ३५६ कोटी रुपये आणि विमा कंपन्यांकडे २४ हजार ५८६ कोटी रुपये बेवारस खात्यांमध्ये पडून होते. आरबीआयने २०१४ ला डिजॉझीटर एज्युकेशन अँड अवेयरनेस फंड (डीईएफ) योजना तयार केली होती. बँकांमधील ज्या पैश्यांचा कुणी वाली नाही, तो पैसा डीईएफला द्यायचा असतो. जेणेकरून बँका डिपॉझिटर्सला या पैश्यांमधून अतिरिक्त लाभ देऊ शकेल, अशी ही योजना होती.
दुसरीकडे विमा कंपन्या अश्या बेवारस पैश्यांना दहा वर्षात कुणी हात लावला नसेल तर हा पैसा ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी वापरतात. त्याचवेळी हा पैसा इतर कोणत्याही कामात लागण्यापूर्वी बँकांनी या पैश्यांचा मुळ मालक शोधण्याची प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबविली पाहिजे, असेही आरबीआयने सूचविल्याचे मंत्र्यांनी सांगितले.
पीएम किसान योजनेत ६८.७ कोटी ट्रान्झॅक्शन
यावर्षीच्या जूनपर्यंत पीएम किसान योजनेंतर्गत ६८.७६ कोटी ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती सरकारने सभागृहात दिली. यातील केवळ १ टक्का ट्रान्झॅक्शन अपयशी ठरले आहेत. फेब्रुवारी २०१९ ला पीएम किसान योजनेची घोषणा करण्यात आली होती. यात शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला ६ हजार रुपये जमा करण्यात येतात.