मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँकेने दिवाळखोरी जाहीर केल्याचे दुष्परिणाम सर्वत्र दिसून येताहेत. या पाठोपाठ भारतातील बँकाही डुबणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. मात्र, देशातील अशा तीन बँका आहेत ज्या सर्वात सुरक्षित आहेत. या बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्ही निश्चिंत रहायला हरकत नाही. या तीन बँका म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), आयसीआयसीआय, एचडीएफसी. या बँकांमध्ये खाते उघडणे सुरक्षित मानले जात आहे. या तीनही बँका कधीही डुबणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या तीनही बँकांना डी-एसआयबी यादीत ठेवले आहे. डी-एसआयबी ही तांत्रिकदृष्ट्या देशांतर्गत प्रणालीतील महत्त्वाची बँक असते. म्हणजे ज्या बँका देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी इतक्या महत्त्वाच्या आहेत की, त्या बुडणे सरकारला परवडणारे नाही. कारण त्यांच्या बुडण्याने देशाची अर्थव्यवस्था विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे आर्थिक संकट आणि दहशतीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. २००८ च्या आर्थिक मंदीनंतर बँकांना डी-एसआयबी म्हणून घोषित करण्याची पद्धत सुरू झाली. त्यानंतर अनेक देशांच्या अनेक मोठ्या बँका बुडाल्या, त्यामुळे आर्थिक संकटाची स्थिती दीर्घकाळ राहिली. २०१५ पासून आरबीआय दरवर्षी डी-एसआयबीची यादी आणते. २०१५ आणि २०१६ मध्ये फक्त एसबीआय आणि आयसीआयसीआय बँक डी-एसआयबी होते. २०१७ पासून या यादीत एचडीएफसीचाही समावेश करण्यात आला आहे.
अशी होते निवड
आरबीआय देशातील सर्व बँकांना त्यांच्या कामगिरीच्या आधारावर, त्यांच्या ग्राहकांच्या आधारावर पद्धतशीर महत्त्व स्कोअर देते. बँकेला डी-एसआयबी म्हणून सूचीबद्ध करण्यासाठी, तिची मालमत्ता राष्ट्रीय जीडीपीच्या दोन टक्क्यांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. बँकेच्या माहितीनुसार, डी-एसआयबीला पाच वेगवेगळ्या टप्प्यांत ठेवले जाते. बकेट फाइव्ह म्हणजे सर्वात महत्त्वाची बँक असते. डी-एसआयबी असलेल्या तीन बँकांमध्ये एसबीआय बकेट थ्रीमध्ये आहे, तर एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँक बकेट वनमध्ये आहे.
Banking Finance 3 Banks Safest in India RBI