मुंबई – बँकांमधून ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरली जाणारी आरटीजीएस सेवा येत्या रविवारी १४ तासांसाठी उपलब्ध नसणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं ही माहिती दिली. आरटीजीएस सेवा बंद असली तरी एनईएफटी ही सेवा उपलब्ध असेल, असं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे. याबाबत सर्व बँकांनी आपल्या ग्राहकांना माहिती द्यावी, अशी सूचना रिझर्व्ह बँकेनं केली आहे. या काळात आरटीजीएस सेवेच्या अद्ययावतीकरणाचं काम होणार आहे. अद्ययावतीकरणानंतर या सेवेची लवचिकता वाढेल, तसंच आपत्कालीन वेळेत पुन्हा पूर्वपदावर येण्यासाठीचा कालावधीही कमी होईल, असं बँकेनं म्हटलं आहे.