मुंबई – बँक ऑफ बडोदा या भारतातील प्रीमियम सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने आपल्या गृह कर्ज दरात 25 बीपीएस ची घट जाहीर केली असून हा दर आता 6.75 टक्क्यांवरून 6.50 टक्क्यांवर* आला आहे. नवा दर 7 ऑक्टोबर 2021 पासून लागू होणार आहे. सणांचे दिवस सुरू असताना आणि ग्राहकांसाठी घर खरेदी किफायतशीर करण्याच्या हेतूने बँकेने हा खास दर जाहीर केला असून तो 31 डिसेंबर 2021 पर्यंत उपलब्ध असेल. नवीन दर गृह कर्जासाठी नव्याने अर्ज करणारे ग्राहक, कर्जाचे हस्तांतरण करू इच्छिणारे ग्राहक, सध्याच्या कर्जासाठी पुनर्वित्तपुरवठा हवे असलेले ग्राहक यांच्यासाठी उपलब्ध असल्याने ही ऑफर अधिक सर्वसमावेशक झाली आहे. गृह कर्जावर शून्य प्रक्रिया शुल्काची ऑफर यापूर्वीच जाहीर करण्यात आली असून ती 31/12/21 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
गृह कर्ज दरात कपात करण्याच्या घोषणेविषयी बँक ऑफ बडोदाच्या मॉर्गेज आणि इतर रिटेल असेट्स विभागाचे जीएम श्री. एच टी सोलंकी म्हणाले, ‘बँकेतर्फे कायमच गृह कर्ज आणि रिटेल कर्जावर स्पर्धात्मक व्याज दर देण्याचा तसेच आमचे डिजिटल प्लॅटफॉर्म्स व खास टीम्सच्या मदतीने याची संपूर्ण प्रक्रिया सफाईदार करण्याचा प्रयत्न केला जातो. सणासुदीच्या हंगामात ग्राहकांना आमच्या या ऑफरचा निश्चितच फायदा होईल. व्याजदरातील कपातीसह बँक ऑफ बडोदा गृह कर्ज आता विविध विभागांवर 31/12/2021 पर्यंत मर्यादित काळासाठी सर्वात स्पर्धात्मक दर उपलब्ध करून देत आहेत.’