मुंबई – देशाची अर्थव्यवस्था रूळावर आणण्यासाठी बँकांकडून कर्जपुरवठा करण्यावर अधिक भर दिला जातो. परंतु कोरोनाच्या संकट काळात एक नवी समस्या समोर उभी राहिली आहे. गेल्या वर्षी प्राप्तीकर भरणा केल्याची प्रत डाउनलोड होत नसल्याने अनेक ग्राहकांकडे प्राप्तीकर भरणा करण्याची प्रतच नाहीये. परिणामी घर, दुकान, प्लॉट, कार आदी खरेदी करण्यासाठी कर्ज घेऊ इच्छिणार्या ग्राहकांना बँकेतून हात हलवत माघारी यावे लागत आहे.
ई-फायलिंग पोर्टलची समस्या
प्राप्तीकर विभागाच्या नव्या ई-फाइलिंग पोर्टलमध्ये समस्या येत असल्यामुळे अनेक प्रक्रियांच्या तारखा पुढे ढकलल्या गेल्या आहेत. ज्यांनी गेल्यावर्षी प्राप्तीकराचा भरणा केला आहे. पोर्टलच्या समस्येमुळे त्यांना प्रतच डाउनलोड करता येत नाहीये. या समस्येचा सर्वाधिक त्रास दुकान, घर किंवा कार खरेदी करण्यासाठी कर्ज घेऊ इच्छिणार्या लोकांना होत आहे. ज्यांच्याकडे गेल्यवार्षीच्या प्रतिची हार्डकॉपी आहे, त्यांना काहीच समस्या नाही. ऑनलाइन भरणा करणार्या ग्राहकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
व्यापारीसुद्धा हैराण
गेल्या वर्षी दाखल केलेल्या प्राप्तीकर भरणा केल्याची प्रत डाउनलोड करणे शक्य होत नाही. कर सल्लागारांना सुद्धा प्रत डाउनलोड करता येत नाही. कर्ज घ्यायचे तर प्राप्तीकर भरल्याची प्रत मागितली जाते. त्यामुळे काही दिवसांसाठी कर्ज घेण्याचे नियोजन पुढे ढकलले जात आहे. ही समस्या अनेक व्यापार्यांची आहे.