मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – असे म्हणतात की सरकारी नोकरी किंवा कुठल्याही बँकेतील नोकरी ही सर्वाधिक सुखाची आहे. टेंशन्स असतात, पण बँक म्हटल्यामुळे निश्चित वेतनवाढ आणि सुट्यांची सुविधा असते. ही सुविधा खासगी क्षेत्रात इतर नोकऱ्यांमध्ये मिळत नाही. पण गेल्या वर्षभरात बँकेची नोकरी सोडणाऱ्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. अर्थातच ही संख्या खासगी बँकांची आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँक यासारख्या सार्वजनिक बँकांमध्ये कर्मचारी नोकरी सोडून जाण्याचे प्रमाण ५ टक्क्यांहून कमी आहे. स्टेट बँकेत हे प्रमाण ३ टक्के, कॅनरा बँकेत ४.२६ टक्के आणि पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदामध्ये केवळ एक टक्का आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे, सार्वजनिक बँकांमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते. अभ्यास करून ही कठीण परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सार्वजनिक बँकांमध्ये नोकरीस लागलेले कर्मचारी सोडण्याचा विचार करीत नाहीत.
सार्वजनिक बँकांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यापासून चांगले वेतन असते. खासगी बँकांमध्ये मात्र, सुरुवातीच्या टप्प्यात कमी वेतन आणि मधल्या फळीपासून जास्त वेतन असा फरक असतो. त्यामुळे खासगी बँकांमधून नोकरी सोडून जाणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. दुसऱ्या बँकेत चांगली वेतनवाढ मिळणार असल्याने नोकरी सोडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तर यात आता खासगी फायनान्स कंपन्यांनी गलेलठ्ठ पगारावर नोकऱ्या द्यायला सुरुवात केल्याने नियमित बँकांमधील कर्मचाऱ्यांनी तिकडे मोर्चा वळवला आहे. परिणामी बँकिंग क्षेत्रातील रिक्त पदांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० ते ४५ टक्के वाढ झाली, तर नवीन भरतीत मागील वर्षीच्या तुलनेत १० ते १२ टक्के वाढ झाली आहे.
२६ टक्क्यांचा दर
भारतीय बँकांच्या एकूण मनुष्यबळात एचडीएफसी बँक, अॅक्सिस, कोटक, आयसीआयसीआय या खासगी बँकांचा वाटा सुमारे ३० टक्के आहे. या बँकांतील कर्मचारी नोकरी सोडून जाण्याचा दर सुमारे २६ टक्के आहे. यामुळे त्यांनी मनुष्यबळात १६ टक्के वाढ केली असली तरी, कर्मचारी नोकरी सोडून जाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे प्रत्यक्षात मनुष्यबळातील वाढ केवळ २ टक्केच झाली आहे.
वाढता वाढता वाढे
देशातील आघाडीच्या खासगी बँकांतून कर्मचारी नोकरी सोडून जाण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत तब्बल ३४ ते ४६ टक्क्यांवर पोहोचले आहे. देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक ठरलेल्या ‘एचडीएफसी’त गेल्या आर्थिक वर्षांत (२०२२-२३) कर्मचारी नोकरी सोडून जाण्याचे प्रमाण ३४.१५ टक्के होते. कोटक बँकेत हे प्रमाण तब्बल ४६ टक्के होते, तर त्याआधीच्या आर्थिक वर्षांत (२०२०-२१) हे प्रमाण २९ टक्के होते.
Bank Employee Left Job Resignation Quitting Job
Banking Finance Trend Salary