नवी दिल्ली – सुट्टी घेण्यासाठी काही कर्मचारी अनेक वेळा वेगवेगळी कारणे शोधून काढतात, परंतु एका कर्मचाऱ्याने सुट्टी घेण्यासाठी अनोखी युक्ती शोधून काढली. तैवानमध्ये एका पुरुषाने सुटी घेण्याच्या बहाण्याने ३७ दिवसात एका महिलेबरोबर चार वेळा लग्न केले आणि तिला ३ वेळा घटस्फोट दिला.
बॅंकेतील एका लिपीकाने पहिल्यांदा सुटीकरिता बँकेत अर्ज केला, तेव्हा त्याला लग्नासाठी आठ दिवसांची सुट्टी मिळाली. ६ एप्रिल २०२० रोजी लग्नानंतर सुट्टी संपल्यावर पत्नीने घटस्फोट घेतला. त्यानंतर दुसर्या दिवशी लग्न करून सुट्टी मागितली. या सुट्टीला कायदेशीररित्या आपण पात्र आहोत, असा कारकुनाचा विश्वास होता. अशाप्रकारे, त्याने लग्नाच्या चार वेळा आणि तीन घटस्फोटांद्वारे ३२ पगारी सुटी घेतली.
दरम्यान, बँकेला त्याच्या सुट्टीच्या या डावाबद्दल (खेळाबद्दल) माहिती मिळाली आणि त्याच्या अतिरिक्त, पगारी सुट्ट्या नाकारण्यात आल्या. त्यामुळे संतप्त कारकुनाने बँकेवर कामगार रजा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करत कामगार संघटनेकडे तक्रार दाखल केली.
येथील स्थानिक कायद्यानुसार कर्मचार्यास एका लग्नासाठी आठ दिवसांची रजा मिळू शकते. त्यानुसार, चार वेळा लग्न झालेल्या या व्यक्तीला ३२ सुटी मिळायला हवी होती. त्यामुळे शहर कामगार ब्युरोने आपल्या तपासणीत बँकेला कामगार कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले. आता नेमकी काय कारवाई होते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.