नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जून महिन्याच्या अखेरपर्यंत तुमची बँकेशी निगडित महत्त्वाची कामे करायची असतील तर ते आधीच करण्याचे नियोजन करा. कारण सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता आहे. देशातील नऊ बँकांच्या कर्मचारी संघटनाची एक संयुक्त संस्था असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने आपल्या विविध मागण्यांसाठी २७ जूनपासून तीन दिवस संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे तीन दिवसात ग्राहकांचे हाल होण्याची शक्यता आहे.
बँकांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना गैरसोय टाळण्यासाठी २४ जून म्हणजेच शुक्रवारपर्यंत आर्थिक कामे करावी लागणार आहेत. त्यानंतर २५ जून हा महिन्याचा चौथा आणि अखेरचा शनिवार आहे. या दिवशी बहुतांश बँकांना सुट्टी असेल. २६ जूनला रविवारी साप्ताहिक सुट्टी आहे. सोमवारी २७ जूनला संपाचा इशारा देण्यात आला आहे.
अखिल भारतीय बँक कर्मचारी संघ (एआयबीईए) चे सरचिटणीस सी. एच. वेंकटचलम यांनी यूएफबीयूच्या बैठकीनंतर सांगितले, की निवृत्तीवेतन योजनेत बदल करण्याची तसेच राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना समाप्त करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी आहे. त्यामध्ये सर्व बँक कर्मचाऱ्यांसाठी जुनी निवृत्तीवेतन योजना पुना सुरू करण्याच्या मागणीचाही समावेश आहे.
अखिल भारतीय बँक अधिकारी महासंघ सरचिटणीस सौम्या दत्ता म्हणाल्या की, देशभरातील सात लाख कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत.
अखिल भारतीय बँक अधिकारी महासंघ (एआयबीओसी), अखिल भारतीय बँक कर्मचारी संघ (एआयबीईए) आणि नॅशनल ऑर्गनायजेशन ऑफ बँक वर्कर्स (एनओबीडब्ल्यू) या कर्मचारी संघटनांचा यूएफबीयूमध्ये समावेश आहे.