नवी दिल्ली – कोरोना संसर्गाच्या अभूतपूर्व वाढीचा विचार करता भारतीय बँक असोसिएशनने (आयबीए) सर्व बँकांना सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान काम करण्याचा सल्ला दिला आहे. भारतीय बँक संघटनेने राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या (एसएलबीसी) संयोजकांना कोविड -१९ च्या स्थिती व आवश्यकतानुसार बँक शाखांची प्रमाणित बँकिंग प्रक्रिया सुलभ करण्यास सांगितले.
आयबीएच्या विशेष व्यवस्थापन समितीच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. आयबीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मेहता यांनी बँक प्रमुखांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आम्ही एसएलबीसी संयोजकांना सीएमओ आणि त्यांच्या संबंधित राज्यांमधील वरिष्ठ राज्य अधिकार्यांशी स्वतंत्रपणे बैठक घेण्यास सूचित करीत आहोत. नव्या परिस्थितीबाबत चर्चा झाल्यानंतर बँकांना सल्लामसलत करावी, तसेच स्थानिक पातळीवर दिलेला सल्ला संपूर्ण प्रणालीसाठी अधिक व्यावहारिक आणि उपयुक्त सिद्ध होईल.
नऊ बँक संघांचे प्रमुख मंच असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन (यूएफबीयू) म्हटले आहे की, प्रत्येक बँकेत संसर्ग होण्याचे प्रकार वाढत आहे. आणि त्यामुळे बँकर्स आजारी पडतात, तेव्हा त्यांना हॉस्पिटलचे बेड आणि ऑक्सिजनची उपलब्धता करणे बॅंकांना कठीण होते. आयबीएला पाठवलेल्या निवेदनात यूएफबीयूने म्हटले आहे की, जोपर्यंत कोरोनाची परिस्थिती सुधारणार नाही, तोपर्यंत सार्वजनिक कामकाजाचे तास कमी करून दररोज तीन तास केले जावेत आणि सेवांवर बंदी घालावी. त्यामुळे कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बँक कर्मचार्यांचे संरक्षण होईल.
तसेच संघटनेने म्हटले आहे की, दररोज बँक कर्मचार्यांना कोरोना विषाणूची लागण, रुग्णालयात दाखल करणे आणि मृत्यूची बातमी ऐकून आम्ही फार दु: खी आहोत. गेल्या महिन्यात त्यांनी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाला एक पत्र लिहून बॅंक कर्मचार्यांना लसीच्या प्राधान्य यादीत समाविष्ट करावे, अशी विनंती देखील केली असल्याचे संघटनेने म्हटले आहे.