मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बँक कर्मचाऱ्यांच्या ग्राहकांसंबंधित कामाच्या पद्धतीवर अनेकदा टिका केली जाते. कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईचे अनेक किस्सेही त्यामुळे ऐकायला मिळतात. पण आता कर्मचारी अशी टोलवाटोलवी करु शकणार नाही. कारण कर्मचाऱ्यांच्या अशा वर्तणुकीला चाप लावण्यासाठी रिझर्व्ह बँकेने ग्राहकांना थेट संबंधित कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचा अधिकार दिला आहे. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांना आता ग्राहकांना योग्य वागणूक देणे गरजेचेच असणार आहे.
महत्त्वाच्या कामासाठी आपण बँकेत जातो आणि संबंधित कर्मचारी जागेवर उपलब्ध नसतो. उपलब्ध असला तरी दुपारच्या जेवणाच्या सुटीनंतर यायला सांगितलं जातं. ग्राहकाकडून थोडी वेळ चुकली तर पुन्हा कामाविषयी बोलणेदेखील कर्मचारी टाळतात. आता या सगळ्याबाबत ग्राहकांना तक्रार करू करता येणार आहे. ग्राहकांनाही बँकिंग सेवांशी संबंधित काही अधिकार असतात, ज्यांच्या माहितीच्या कमतरतेच्या अभावी ते लाभ घेऊ शकत नाहीत.
बँकेत ग्राहकांना असे अनेक अधिकार मिळतात, जे सहसा ग्राहकांना माहीत नसतात. बँकेने ग्राहकांशी नीट वागणे महत्त्वाचे आहे. कर्मचाऱ्यांनी योग्य वर्तन न केल्यास ग्राहकांना थेट रिझर्व्ह बँकेकडे (आरबीआय) संपर्क साधण्याचा अधिकार आहे. असे कोणतेही प्रकरण तुमच्या निदर्शनास आल्यास तुम्ही बँकिंग लोकपालकडे तक्रार करून तुमच्या समस्येचे निराकरण करू शकता.
बँकेच्या ग्राहकांना अनेक अधिकार देण्यात आले आहेत. या अधिकाराअंतर्गत कोणत्याही बँकेच्या कर्मचाऱ्याला तुमचे काम करण्यास उशीर झाला तर तुम्ही त्या बँकेच्या व्यवस्थापक किंवा नोडल ऑफिसरकडे तक्रार करता येते. याशिवाय जवळपास प्रत्येक बँकेत ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तक्रार निवारण मंच असतो, ज्याद्वारे तुम्ही तुमची तक्रार करता येते. ज्या बँकेचे ग्राहक आपण असू त्या बँकेच्या कर्मचाऱ्याच्या तक्रारीसाठी बँकेचा तक्रार निवारण क्रमांक घेऊन तक्रार करता येते. तसेच बँकेचा टोल फ्री क्रमांकावरही समस्या सांगू शकता. याशिवाय काही बँका ऑनलाइन तक्रार दाखल करण्याची सुविधाही देतात.
बँक कर्मचाऱ्याच्या टाळाटाळ करण्याबाबत बँकिंग लोकपालकडे तक्रार करता येते. फोन करून किंवा ऑनलाइन पाठवू शकता. तुमची तक्रार ऑनलाईन नोंदवण्यासाठी तुम्ही https://cms.rbi.org.in या वेबसाइटवर लॉगइन करू शकता आणि तक्रार दाखल करू शकता. बँकेच्या ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी टोल फ्री क्रमांक १४४४८ असून, त्यावर कॉल करूनही ग्राहकांना तक्रार करता येते.
Bank Customers Right to Know and Use It