मुंबई – बँकेमध्ये नोकरी मिळावी अशी आजच्या काळात अनेक तरुणांची अपेक्षा असते. तरुणांना ही अपेक्षा पूर्ण होण्याची संधी आता मिळणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) ने त्यांच्या अधिकृत वेबसाइट ibps.in वर लिपिक भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार 11 बँका या परीक्षा प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन लिपिक 2021 भरतीसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजेच दि. 7 ऑक्टोबरपासून सुरू होईल. तसेच देशभरातील विविध बँकांमध्ये 7,800 पेक्षा जास्त लिपिक पदांसाठी भरती अधिसूचना जारी केली जाईल. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2021 आहे.
IBPS प्राथमिक परीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या आधारावर राष्ट्रीयकृत बँकांसाठी लिपिकांची निवड करते. आत्तापर्यंत, IBPS ने परीक्षेच्या विविध टप्प्यांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर केले आहे. या वर्षी पहिल्यांदा ही परीक्षा इंग्रजी आणि हिंदीसह 13 प्रादेशिक भाषांमध्ये घेतली जाईल.
कोण अर्ज करू शकतो
या पदांसाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच उमेदवाराची वयोमर्यादा किमान 20 वर्षे आणि कमाल 28 वर्षे आहे, ते लिपिक पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. अधिकृत अधिसूचनेनुसार 11 बँका परीक्षेत सहभागी होतील. यात बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, यूको बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक आणि पंजाब आणि सिंध बँक आदींचा समावेश आहे.