मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तुम्ही चेकने व्यवहार करीत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचे वृत्त आहे. कारण, पंजाब नॅशनल बँक म्हणजेच पीएनबीने आजपासून पॉझिटीव्ह पे सिस्टीम (PPS) लागू केली आहे. इतरही बँकांनी ही प्रणाली यापूर्वीच लागू केली आहे. आता पीएनबीने दिलेल्या माहितीनुसार, ४ एप्रिल २०२२पासून चेक पेमेंटसाठी पडताळणी आवश्यक असणार आहे. जर या नियमानुसार चेकची पडताळणी झाली नाही तर चेकदेखील परत केला जाऊ शकतो.
पीएनबीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबत ट्विट केले आहे. बँकेने म्हटले आहे, “४ एप्रिल २०२२पासून पॉझिटीव्ह पे सिस्टीम अनिवार्य केली आहे. जर ग्राहकांनी बँकेच्या शाखेतून किंवा डिजिटल माध्यमातून १० लाख रुपये किंवा त्याहून अधिकचे चेक जारी केले तर, पीपीएस पुष्टीकरण अनिवार्य असेल. ग्राहकांना खाते क्रमांक त्यासाठी द्यावा लागेल. तसेच चेक नंबर, चेकची तारीख, चेकची रक्कम आणि लाभार्थीचे नाव द्यावे लागेल. अधिक तपशीलांसाठी, पीएनबी ग्राहक १८०० – १०३ – २२२२ किंवा १८०० – १८० – २२२२ वर कॉल करू शकतात. किंवा बँकेच्या वेबसाइटला भेट देऊ शकता.
यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, एक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि इतर बँकांनी ही प्रणाली अनिवार्य केली आहे. कोणत्या बँकेत किती चेकवर हा सिस्टीम केली जात आहे ते जाणून घेऊया.
१. स्टेट बँक ऑफ इंडिया : स्टेट बँक ऑफ इंडियाने १ जानेवारी २०२१पासून चेक पेमेंटसाठी एक नवीन प्रणाली लागू केली आहे. SBI ने हे ५० हजार रुपयांपेक्षा जास्त चेक पेमेंटसाठी लागू केले आहे म्हणजेच तुम्ही पन्नास हजारांपेक्षा जास्त रकमेचे चेक केल्यास तुम्हाला पडताळणी करावी लागेल.
२. बँक ऑफ बडोदा : चेक क्लिअरन्सशी संबंधित बँक ऑफ बडोदाचे नियम (पॉझिटिव्ह पे कन्फर्मेशन) १ फेब्रुवारीपासून प्रभावी आहेत. बँक ऑफ बडोदाचा हा नियम १० लाख किंवा त्याहून अधिक रकमेच्या चेकवर लागू आहे.
३. बँक ऑफ इंडिया : बँक ऑफ इंडियाच्या चेकशी संबंधित हे नियम १ जानेवारी २०२१पासून प्रभावी करण्यात आले आहेत. बँक ऑफ इंडियामध्ये ५० हजार रुपये आणि त्यावरील चेक क्लिअरन्ससाठी पडताळणी अनिवार्य आहे. ग्राहकाला खाते क्रमांक, चेक क्रमांक, चेकची तारीख, रक्कम आणि प्राप्तकर्त्याचे नाव यासह माहिती प्रदान करावी लागेल.
काय आहे पॉझिटीव्ह पे सिस्टीम?
पॉझिटिव्ह पे सिस्टम हे एक प्रकारचे फ्रॉड रोखण्यासाठीचे माध्यम आहे. या सिस्टीमअंतर्गत, जेव्हा कोणी चेक जारी करतो तेव्हा त्याला त्याच्या बँकेला संपूर्ण माहिती द्यावी लागेल. यामध्ये चेक जारी करणाऱ्याला चेकची तारीख, लाभार्थीचे नाव, खाते क्रमांक, एकूण रक्कम आणि इतर आवश्यक माहिती एसएमएस, इंटरनेट बँकिंग, एटीएम किंवा मोबाइल बँकिंगद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने बँकेला द्यावी लागेल. या प्रणालीमुळे जिथे चेकद्वारे पेमेंट सुरक्षित राहील, तिथे क्लिअरन्सलाही कमी वेळ लागेल. यामध्ये दिलेला फिजिकल चेक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. ही एक अतिशय सोपी आणि सुरक्षित प्रक्रिया आहे