इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आजचा काळ हा आधुनिकतेचा आहे. असे जरी असले तरी अशा व्यवहारांमध्ये योग्य सावधानता बाळगणे अतयंत गरजेचे आहे. डिजिटल तंत्रज्ञान अधिक प्रभावी झाल्याने बँकाही त्या कक्षेत आहेत. डिजिटल तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना अधिक उत्तम सेवा देता येते. त्यातच सगळे व्यवहार कॅशलेस करण्याचे सरकारचेही धोरण आहे. रोखीचे व्यवहार आता खूप कमी होताना दिसतात. तर डिजिटल पेमेंट किंवा चेकने व्यवहार होतात. अनेकदा खात्यात पैसे नसताना चेक दिले जातात परिणामी चेक बाऊन्स व्हायचे प्रकार घडतात. आता तुमचा चेक बाउन्स होणार असेल तर सावधान. वेळीच खबरदारी घ्या अन्यथा मोठ्या कारवाईला तुम्हाला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते.
बँक खाते उघडताना ग्राहकाला अनेक सुविधा मिळतात. त्यांना डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, चेकबुक अशा सुविधा मिळतात. जर तुम्ही धनादेशाद्वारे रक्कम अदा करत असाल तर आता सावधगिरी बाळगण्याचाही गरज आहे. धनादेश न वठल्यास अर्थात चेक बाऊन्स झाल्यास कठोर नियम करण्यात आले आहेत. चेक बाऊन्स करणाऱ्यांना कायमचा धडा शिकवण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. केंद्र सरकार चेक बाऊन्सचे नवीन नियम तयार करत आहे. यासंबंधी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयातील तज्ज्ञांची एक समिती तयार केली आहे. या समितीने केंद्र सरकारला काही शिफारसी केल्या आहेत.
अर्थमंत्रालयाने एक उच्चस्तरीय बैठक घेतली. यादरम्यान चेक बाऊन्सच्या नियमात बदल करण्याची सूचना करण्यात आली आहे. या सूचनांवर विचार करुन केंद्र सरकार लवकरच धनादेश बाऊन्स होण्याबाबत नवीन नियम लागू करणार आहे. चेक बाऊन्सच्या नियमानुसार ग्राहकाच्या खात्यात किमान रक्कम शिल्लक नसल्यास त्याच्या दुसऱ्या बँक खात्यातून ही रक्कम कपात करण्याचे अर्थमंत्रालयाने ठरवले आहे. तसेच धनादेशाद्वारे ग्राहक पेमेंट करणार असेल तर त्याच्या खात्यात शिल्लक रक्कम असणे अनिवार्य करण्यात येणार आहे.
धनादेशावर नोंदवलेल्या रकमेइतकी रक्कम खात्यात नसेल तर संबंधित ग्राहकावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. एवढेच नाही तर बँक खाते बंद करण्यात येईल आणि नवीन बँक खाते उघडण्यासही मनाई करण्यात येणार आहे. अर्थात याविषयीच्या प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. पण हे नवीन नियम एवढ्या कठोरपणे लागू झाल्यास लोकांची फसवणुकीपासून कायमची मुक्तता होईल. फसवणूक करणाऱ्यांना बँका वाळीत टाकतील. अशा लोकांची ओळखही पटेल आणि इतर लोकांची फसवणूक त्यामुळे टळेल. तसेच यासाठी मोठा दंडही आकारण्यात येणार आहे.
सध्या चेक बाऊन्स प्रकरणात शिक्षेची तरतूद आहे. धनादेश अनादर प्रकरणात आरोपीविरोधात गुन्हा दाखल होतो. या प्रकरणात दंडाची तरतूद आहे. तसेच ज्याची फसवणूक झाली, त्याला दुप्पट रक्कम परत करावी लागू शकते. अशा व्यक्तीला दोन वर्षांचा कारावास होऊ शकतो.
Bank Cheque Bounce New Rule Strict Action