जालना (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांमध्ये आर्थिक फसवणूकीचे प्रकार वाढत आहेत, विशेषतः मोबाईल वरून खोटी माहिती सांगत एखाद्या बँक ग्राहकाची आर्थिक लूट करण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. मराठवाड्यातील जालना व छत्रपती संभाजी नगर भागात अशा प्रकारचे फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येते. त्यात जालन्यातील एका महिलेने पोलीस कर्मचाऱ्याला विश्वासात घेऊन मी बँकेचे अधिकारी असल्याचे सांगत त्यांच्याकडून क्रेडीट कार्ड, बँक डिटेल्स व ओटीपीची माहिती घेऊन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिलेने सुमार दिड लाख रुपयांची फसवणूक केली आहे. विशेष म्हणजे यातील महिला आरोपी करिश्मा सोनवणे ही एका राष्ट्रीय बँकेच्या गारखेडा शाखेची कर्मचारी असल्याचे पोलीस तपासात उघड झाल्याने पोलिस या प्रकारणी अधिक तपास करत आहे.
आय खरेदी केले
जालना शहरात पोलीस अधीक्षक कार्यालयात राम पारवे हे कर्मचारी नेहमीप्रमाणे आपल्या कामात कार्यरत असताना त्यांच्या मोबाईलवर एक कॉल आला. पलीकडून एका महिलेने गोड आवाजात संवाद साधला. आपण बँक कर्मचारी असून तुमचे बँक डिटेल हवेत, अशी विनवणी केली. मी करिष्मा पाटील बोलतेय, असे म्हणत बँकेची अधिकारी असल्याचे भासवले. चक्क या महिलेने कॉलवरून क्रेडीट कार्ड, बँक डिटेल्स व ओटीपीची माहिती घेतली. याद्वारे फ्लिपकार्टच्या माध्यमातून आयफोन मोबाईल खरेदी केला आहे. पारवे यांना ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसांत तक्रार दिली. पोलीस असतानाही आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. महिला पोलिसाची फसवणूक करू शकते तर सर्वसामान्य ग्राहकांची कशी फसवणूक करत असेल याचाही ते विचार करू लागले.
सुमारे दोन लाखाचा मुद्देमाल जप्त
पोलीस अधीक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांची फसवणूक झाल्याने अन्य पोलीस सहकाऱ्यांनी या प्रकरणी तात्काळ छडा लावण्याचे ठरविले त्यानुसार लगेच तपासच चक्रे फिरू लागली. यानंतर सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे फिर्यादींची ऑनलाईन फसवणूक झालेली रक्कम आरोपींनी फ्लिपकार्टद्वारे आयफोन मोबाईल खरेदी करण्यासाठी वापरली असल्याचे शोधून काढले. यानंतर पोलिसांनी आरोपी महिला करिष्मा सोनवणे हिला संभाजीनगर व अमोल वारकर याला नगर जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. या गुन्हात वापरलेल्या ५ मोबाईल रोख रक्कमेसह एकूण १ लाख९१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच या आरोपींच्या विरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात आणि माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. एका बँक कर्मचाऱ्यांने बँक अधिकारी असल्याचे भासून अशाप्रकारे गुन्हे करण्याचे धाडस केल्याने आता पोलीस आणखी या महिलेने काय कारणामे केले याचाही तपास करीत आहेत.