मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
सध्याच्या काळात बॅंकेचे व्यवहार ऑनलाईन झाले तरी बहुतांश जण प्रत्यक्ष बँकेत जाऊन एटीएम मधून पैसे काढतात. बॅंकेतील पैसे काढताना फाटक्या नोटा मिळाल्या तर आपण त्या लगेच बदलून घेऊ शकतो. परंतु एटीएम मधून फाटलेल्या नोटा मिळाल्या तर काय करावे. याबाबत अनेक ग्राहकांना प्रश्न पडतो. मात्र यावर देखील काही पर्याय उपलब्ध आहेत.
बहुतांश नागरिकांना आठवत असेल की, नोटाबंधीच्या काळात स्वतःच्या पैशासाठी बँकेत लांबच लांब रांगेत उभे राहावे लागले. त्यातही कधी सर्व्हरची अडचण, कधी बँकेला सुट्ट्या यांचा अडथळा होता, म्हणजे पैसे काढण्यासाठी त्याला खूप अडचणींचा सामना करावा लागला. पण आता तसे काही कारण नाही, अलीकडे बँकिंग क्षेत्रात खूप बदल झाले आहेत. आता बँकेशी संबंधित जवळपास सर्व कामे ऑनलाइन करू शकता. बँक खाते उघडावे लागेल, केवायसी करावे लागेल, एखाद्याला पैसे पाठवावे लागतील. ही सर्व कामे मोबाईल किंवा कॉम्प्युटरद्वारे केली जातात.
आता प्रत्येक रस्त्यावर-चौकात पैसे काढण्यासाठी एटीएम मशीन आहे. पण अनेकवेळा ग्राहकांना असे दिसून येते की, जेव्हा ते एटीएममधून पैसे काढतात तेव्हा त्यांना फाटलेल्या नोटा मिळतात. अशा परिस्थितीत ते अस्वस्थ होतात आणि त्यांना समजत नाही की आता काय होईल? याविषयी अधिक जाणून घेऊ या…
RBI ने बँकिंग क्षेत्रासाठी अनेक नियम बनवले आहेत, त्यापैकी एक फाटलेल्या नोटांसाठी देखील आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, एटीएममधून फाटलेल्या नोटा तुम्हाला बँकेत घेऊन जाव्या लागतील आणि बँक त्या बदलण्यास नकार देऊ शकत नाही.
अशा प्रकारे बदलून मिळतील
1 : ज्या एटीएममधून तुमच्या फाटलेल्या नोटा काढण्यात आल्या आहेत, तुम्हाला त्या एटीएमशी जोडलेल्या बँकेत जावे लागेल. येथे तुम्हाला एक अर्ज द्यायचा आहे, ज्यामध्ये तुम्ही पैसे कुठून काढले, किती, वेळ इत्यादी माहिती द्यावी लागेल.
2 : या अॅप्लिकेशनसोबत तुम्हाला एटीएममधून काढलेली स्लिपही जोडावी लागेल. तुमच्याकडे एटीएम स्लिप नसेल, तर तुम्हाला मोबाईलवर आलेल्या मेसेजमध्ये आलेल्या व्यवहाराची माहिती द्यावी लागेल.
3 : बँकेला अर्ज आणि इतर सर्व आवश्यक माहिती दिल्यानंतर बँक तुमच्या फाटलेल्या नोटा जमा करुन घेईल आणि तुम्हाला नोटा बदलून देईल.