मुंबई – असे अनेक जण म्हणतात की बँकेत जास्त पैसे ठेवू नये. पण का ठेवू नये याचे कारण मात्र ते सांगू शकत नाही. बँक आणि पैशांबाबत नागरिकांचे अनेक समज, गैरसमज आहेत. बँकेत पाच लाख रुपयांपेक्षा अधिक पैसे ठेवू नये असेही अनेक जण सांगतात. पण असा काही नियम नाहीय. तुमच्या मर्जीप्रमाणे बँकेत हवे तेवढे पैसे ठेवू शकतात. बँक बुडाली किंवा तिचे दिवाळे निघाल्यानंतर सरकारकडून पाच लाख रुपये मिळतात. म्हणजेच बँकेत पाच लाखांपर्यंत सुरक्षेची हमी आहे. त्यामुळेच अनेक जण असा विचार करतात की बँकेत पाच लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम ठेवू नये.
बँकेत जास्त पैसे ठेवल्याचे काही वेळा नुकसानही होते. बँकेत अधिक पैसे ठेवल्यास आधी प्राप्तीकर विभागाच्या नजरेत तुम्ही येऊ शकतात. परंतु त्याने घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. पैशांचे स्रोत ठाऊक नसल्यास तुम्हाला प्राप्तीकर विभागाची नोटीस येऊ शकते. त्यामुळे बँकेत पैसे ठेवताना ते पैसे कुठून आले, खात्यात कसे जमा झाले याची संपूर्ण माहिती तुमच्याकडे उपलब्ध असावी.
बँकेच्या खात्यात जास्त रक्कम आढळून आली आणि प्राप्तीकर विभागाला पैशांचे स्रोत सांगू शकला नाही, तर तुमच्या अडचणी वाढण्याची शक्यता असते. प्राप्तीकर विभाग बँक खाते गोठवून तुमच्यावर कारवाई करू शकतो.
बचत खात्यात जास्त पैसे ठेवण्याचे एक नुकसान असेही आहे की जमा केलेल्या रकमेवर कमी व्याज मिळते. त्यामुळे खात्यात जास्त पैसे जमा करण्याचा फायदा होत नाही. ते पैसे तुम्ही मुदत ठेव म्हणजेच फिक्स डिपॉझिटमध्ये किंवा म्युच्युअल फंडात गुंतवू शकता. त्या पैशांवर तुम्हाला जास्त व्याज मिळू शकते. नुकसान टाळण्यासाठी बँक खात्यात जास्त रक्कम ठेवण्याआधी व्यवस्थित विचार करावा.