नवी दिल्ली – कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकाराबाबत संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण पसरले असताना नुकतेच दक्षिण आफ्रिकेतून बेंगळुरूला आलेल्या दोघांपैकी एकाचा नमुना ‘डेल्टा व्हेरिएंट’पेक्षा वेगळा आहे. मात्र हा विषाणू ओमिक्रॉन प्रकाराचा दिसतो, असे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचवेळी महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात डोंबिवलीमध्ये दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. या ३२ वर्षीय बाधित पुरुषाचा नमुना ‘जीनोम सिक्वेन्सिंग’साठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान १८ नोव्हेंबर रोजी आफ्रिकेतून जबलपूरला आलेल्या मध्य प्रदेश बोत्सवाना येथील महिलेचा शोध सुरू आहे.
कर्नाटकचे आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर म्हणाले की, गेल्या नऊ महिन्यांपासून केवळ डेल्टा प्रकाराची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. परंतु एक व्यक्तीचे नमुने ओमिक्रॉनचा प्रकार असण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अधिकृतपणे आपण कोणतेही ठोस वक्तव्य करू शकणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांनी सांगितले की, आम्ही ICMR आणि केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत.
वेगळ्या प्रकाराची लागण
दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या या व्यक्तीचा नमुना आयसीएमआरकडे पाठवण्यात आला आहे. मात्र प्रवाशाच्या आतापर्यंतच्या कोविड चाचणी अहवालावरून असे दिसून आले आहे की त्याला कोरोनाच्या वेगळ्या प्रकाराची लागण झाली आहे. सुधाकर म्हणाले की, या ६३ वर्षीय व्यक्तीचे नाव मी उघड करणार नाही, ज्याचा अहवाल थोडा वेगळा आहे. त्यात सापडलेला विषाणू डेल्टा प्रकारापेक्षा वेगळा दिसतो. आम्ही ICMR च्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर हे सांगू शकू. आम्ही ओमिक्रॉन प्रकाराचा तपशीलवार अहवाल मागवला आहे. दि. १ डिसेंबर रोजी आम्हाला ओमिक्रॉन कसे असते याचे स्पष्ट चित्र मिळेल आणि त्यानुसार सर्व उपाययोजना सुरू करू.
ओमिक्रॉन धोकादायक नाही
डॉ. के. सुधाकर म्हणाले की, गेल्या १४ दिवसांत दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या सर्व प्रवाशांवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. एवढेच नाही तर खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही या प्रवाशांच्या प्राथमिक आणि दुय्यम संपर्कांचा शोध घेणे आणि शोधणे सुरू ठेवत आहोत. दक्षिण आफ्रिकेत काम करणाऱ्या माझ्या डॉक्टरांशी बोललो असून ते म्हणतात की, ओमिक्रॉन प्रकार डेल्टासारखा धोकादायक नाही. संक्रमित लोकांना अस्वस्थता आणि उलट्या होतात. काहीवेळा बीपी देखील वाढतो परंतु या रुग्णांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. एवढेच नाही तर त्यांची चव आणि वासाचा अनुभवही कायम राहतो.
१० हजारांहून कमी रुग्ण
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या तीन दिवसांपासून संसर्गाची १०हजारांहून कमी नवीन प्रकरणे सातत्याने येत आहेत. तसेच २४ तासांत सुमारे ८ हजार नवीन रुग्ण आढळले असून २३६ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, त्यापैकी निम्म्याहून अधिक प्रकरणे आणि मृत्यू एकट्या केरळमधील आहेत.
देशातील कोरोनाची स्थिती
– २४ तासांत ८,३०९ नवीन प्रकरणे,
– एकूण सक्रिय प्रकरणे १,०३८५९,
– २४ तासांत ४२.०४ लाख लशीकरण,
– एकूण लसीकरण १२३.०७ कोटी
आतापर्यंतचे लसीकरण
कोविन पोर्टलच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण १२३.०७ कोटी अँटी-कोरोना लशींचे डोस देण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पहिल्या डोसपेक्षा दुप्पट डोस दिला जात आहे. केंद्राने आतापर्यंत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना १३७ कोटींहून अधिक डोस दिले आहेत. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अद्याप २४.६१ कोटी डोस शिल्लक आहेत.