इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी)ने सिलहट येथे आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीमध्ये हिंदू नागरिकांना गोमांस म्हणजेच बिफ खाण्यासाठी वाढण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे, कार्यक्रमस्थळी उपलब्ध करून देण्यात आलेल्या मेन्यूमध्ये बिफऐवजी दुसरी कोणत्याही पदार्थाचा पर्याय देण्यात आला नव्हता. या इफ्तार पार्टीचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला.
बांगलादेशमधील वृत्तपत्रांच्या वृत्तानुसार, बीएनपीने गुरुवारी सिलहट येथे आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीमध्ये किमान २० नेते आणि हिंदू कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात मुस्लिमधर्मियांसह इतर धर्मातील नागरिकही सहभागी होतात. इफ्तारसाठी प्लेटमध्ये इतर पदार्थांसह बिफही वाढण्यात आले.
इफ्तारमध्ये आमंत्रित करण्यात आलेल्या हिंदू पत्रकारांनाही कथितरित्या गोमांस वाढण्यात आले. या घटनेनंतर बीएनपीच्या स्थानिक हिंदूंनी आयोजकांची फेसबुकवर पोस्ट टाकून निषेध केला. बीएनपीचे संतप्त झालेले स्थानिक सदस्य मंटू नाथ सांगतात, बिफऐवजी दुसरा कोणताही पदार्थाचा पर्याय नसल्याने माझ्यासह २० इतर हिंदू सहकाऱ्यांना सर्व मुस्लिम नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना उपवास सोडताना पाहावे लागले.
बीएनपीचा विद्यार्थी संघटनेचा स्थानिक नेता कनक कांती दास सांगतो, इफ्तार पार्टीमधील व्यवस्था म्हणजे गोंधळच होता. तुम्ही तुमच्या इफ्तारचा आनंद घेतला आणि आमंत्रित केलेले हिंदू बांधव फक्त पाहात राहिलो. सिलहट जिल्ह्यातील बीएनपीच्या नेत्यांनी माफी न मागता आपली चूक स्वीकारली.
बांगलादेशमधील स्तंभलेखक आणि एकशी पदकाने सन्मानित अजय दास गुप्ता सांगतात, ज्या सैनिक शासकांनी बांगलादेशावर १५ वर्षे ताबा मिळवला होता. त्यांनी पाकिस्तान समर्थक जमात-ए-इस्लामी या संघटनेला अधिकृत मान्यता दिली होती. त्यांनी राज्यघटनेत बदल केले. त्यामुळे देशाचे धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी राजकारण कमकुवत झाले. अखेर त्यांनी इस्लाम हाच बांगलादेशचा राज्य धर्म राहील असे जाहीर केले होते. बीएनपी आणि त्यांचे सहकारी जमात-ए-इस्लामीसारख्या काही पक्षांनी मूलतत्ववादी पाकिस्तानी सैन्य मॉडेल लागू करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी ठरला.