नवी दिल्ली – भारताचे शेजारी राष्ट्र असलेल्या बांगलादेशमध्ये सध्या हिंदू समुदायाला लक्ष्य केले जात आहे. या हल्ल्यांमुळे सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच हिंदू मंदिरे आणि अन्य धार्मिक स्थळांचेही मोठे नुकसान केले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदू समुदायावर सातत्याने हल्ले होत आहेत. वास्तविक, 1971 मध्ये बांगलादेशच्या निर्मिती झाल्यापासूनच हिंदू समुदायाशी ही लढाई सुरू झाली आहे. गेल्या नऊ वर्षांत हिंदूंवर 3600 हून अधिक हल्ले झाले आहेत. कारण बांगलादेशात 1974 मध्ये प्रथम जनगणना झाली. यानुसार 1974 मध्ये देशात 13.5 टक्के हिंदू होते, परंतु 2011 मध्ये केवळ 8.5 टक्के हिंदू देशात राहिले. 2011 ते 2021 पर्यंत त्यात आणखी तीन टक्क्यांनी घट झाली आहे. विशेष म्हणजे या देशात हिंदूंची संख्या वर्षानुवर्ष कमी होत आहे. आता तर पाकिस्तान प्रमाणेच हिंदू या देशात अत्यंत अल्पसंख्यांक झाले आहेत, काय आहे नेमकी कारणे जाणून घेऊ या…
अत्याचार वाढले
पाकिस्तान पासून वेगळा देश निर्माण झाल्यानंतर येथे हिंदूंवरील अत्याचार वाढू लागले. तेव्हा पासून असे एक वर्ष गेले नाही की, येथे अल्पसंख्याक समुदायाला हल्ल्याचा सामना करावा लागला नाही. गेल्या नऊ वर्षांत हिंदूंवर 3600 हून अधिक हल्ले झाले आहेत. मानवाधिकार संघटनांची ही आकडेवारी आहे. बांगलादेशात 1990, 1995, 1999, 2002 मध्ये मोठ्या दंगली झाल्या. यामध्ये केवळ हिंदूंनाच लक्ष्य केले गेले. आता बांगलादेशात हिंदू मंदिरांची तोडफोड, हिंदूंची घरे जाळणे, मुला -मुलींचे अपहरण, बलात्कार अशा घटना जणू काही सामान्य झाल्या आहेत.
अतिरेकी तरूण
एका अहवालानुसार, बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचाराचे मुख्य कारण म्हणजे त्यांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न आहे. काही अहवालांमध्ये ही वस्तुस्थिती निदर्शनास आली आहे. किंबहुना, हिंसाचाराच्या प्रकारात हे दिसून आले आहे की, बहुसंख्य लोकसंख्या गरीब हिंदूंची घरे जाळते. घर जाळल्यामुळे या हिंदू कुटुंबांना स्थलांतर करण्यास भाग पाडले जाते आणि त्यांनी स्थलांतर करताच तेथे रहिवासी हे त्यांच्या घरे आणि जमिनीचा ताबा घेतात.
तर 2050 पर्यंत
2016 मध्ये बांगलादेशातील हिंदूंच्या स्थितीवर एक पुस्तक प्रसिध्द करण्यात आले. आता पुढील तीन दशकांत बांगलादेशातून हिंदूंचे नामोनिशान मिटवले जाईल, असा दावा या पुस्तकात करण्यात आला होता. सदर पुस्तक हे ढाका विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. अबुल बरकत यांच्या संशोधनावर आधारित आहे. त्यांच्या मते, अल्पसंख्याक समुदायाचे सरासरी 632 लोक दररोज बांगलादेश सोडत आहेत.
मूलगामी संघटना
सध्या बांगलादेशातील कट्टरपंथी संघटनांचा प्रभाव लक्षणीय वाढला आहे. कट्टरपंथी संघटना अनेकदा अल्पसंख्याक हिंदू समाजाला लक्ष्य करतात. देशभरात कट्टरपंथी विचारांच्या लोकांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यांनी वेळोवेळी हिंदू समाजाच्या विरोधात अनेक मोर्चे काढले.
1971 मध्ये सर्वाधिक
बांगलादेशच्या इतिहासातील हिंदूंवरील सर्वात जास्त गुन्हे 1971 च्या बांगलादेश मुक्तिसंग्रामादरम्यान घडले. या दरम्यान पाकिस्तानी सैन्याने हिंदूंचे गाव पुसले. एका अहवालानुसार, या काळात 30 लाखांहून अधिक हिंदूंची कत्तल करण्यात आली, असे एका अहवालात म्हटले आहे.