ढाका (बांगलादेश) – अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंबांधवांसह मंदिरांना काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे जगभरात खळबळ माजली. हा सर्व प्रकार का घडला याचा मोठा खुलासा झाला आहे. अल्पसंख्यांक हिंदू समुदायाविरूद्ध हिंसा भडकविण्यासाठी सोशल मीडियात जातीय द्वेष पसरविणारी पोस्ट फेसबुकवर टाकल्याचे मुख्य संशयित आणि त्याच्या साथीदाराने कबूल केले आहे. विशेष म्हणजे, फेसबुकवर फॉलोअर्सची संख्या वाढविण्यासाठी त्याने हा उद्योग केल्याचेही त्याने न्यायालयास सांगितले आहे. न्यायालयाच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.
दोषी शौकत मंडल याने दंडाधिकाऱ्यांसमोर कबूल केले की, त्याच्या फेसबुक पोस्टमुळे दि. १७ ऑक्टोबर रोजी दुर्गा पूजे दरम्यान पीरगंज जिल्ह्यामधील रंगपूरमध्ये हिंसा झाली. या कटाचा साथीदार रबिउल इस्लाम (३६) हा मौलवी असून त्याच्यावर जाळपोळ आणि दरोड्याचा आरोप आहे. शौकत मंडल आणि त्याचा सहकारी रबिउल इस्लाम यांनी उत्तर-पश्चिम रंगपूर येथील वरिष्ठ न्यायदंडाधिकारी देलवार हुसैन यांच्यासमोर गुन्ह्याची कबुली दिली आहे. अधिकाऱ्याने त्यास दुजोरा दिला आहे.
पोलिसांनी त्याला गाझीपूर येथून अटक केली. तसेच त्याच्या विरोधात डिजिटल सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. मंडल हा रंगपूरच्या एका महाविद्यालयात तत्त्वज्ञानाचा विद्यार्थी आहे. अटकेनंतर त्याला सत्ताधारी अवामी लीगची विद्यार्थी संघटना स्टुडंट लीगमधून काढून टाकण्यात आले. एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की, त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी फॉलोअर्सची संख्या वाढवण्यासाठी फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर अपलोड केला होता. कायदेशीर कारवाईचा भाग म्हणून आतापर्यंत किमान सात जणांनी त्यांच्या गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे या रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. या हिंसाचाराशी संबंधित प्रकरणांमध्ये सुमारे २४ हजार संशयितांवर आरोप ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत ६८३ जणांना अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात ७० हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.