ढाका (बांगलादेश) – पाकिस्ताननंतर आता बांगलादेशात देखील तेथील अल्पसंख्याक हिंदूंच्या मंदिरांना लक्ष्य करण्यात आले आहे. बांगलादेशातील अतिरेक्यांनी अनेक घरांवर, दुकानांवर हल्ला केला. इतकेच नव्हे तर अल्पसंख्यांक हिंदू समाजाच्या चार मंदिरांचीही तोडफोड केली. ही भयानक घटना बांगलादेशच्या खुलना जिल्ह्यातील रुपशा तालुक्याच्या शियाली गावातील आहे.
शियाली येथे चार मंदिरांच्या अनेक मूर्तींची तोडफोड करण्यात आली असून त्याचबरोबर सहा दुकाने आणि हिंदू लोकांच्या काही घरांची तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी १० जणांना अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, या घटनेनंतर भागात तणाव निर्माण झाला. त्यामुळे अधिकाऱ्यांना अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करावा लागला.
एका ग्रामस्थाने सांगितले की, अल्पसंख्यांक हिंदू महिला भक्तांच्या गटाने धार्मिक मिरवणूक काढली. ती मिरवणूक पूर्बा पारा मंदिरापासून शियाली स्मशानभूमीपर्यंत नेण्यात येणार होती. मात्र वाटेत मशिदी जवळून जात असताना विरोध झाला. यामुळे हिंदू भक्त आणि इस्लामिक मौलवींमध्ये जोरदार वादावादी झाली. त्यानंतर सुमारे शंभर हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी तोडफोड सुरू केली. हिंसाचारादरम्यान चार मंदिरांची तोडफोड करण्यात आली. एका घराची आणि सहा दुकानांची तोडफोड करण्यात आली.
काही हिंदूंनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना मारहाण करण्यात आली त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह मोठा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिस पथके तैनात असून गावातील परिस्थिती नियंत्रणात आहे.