नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– युनायटेड वी स्टॅंड फाऊंडेशनने ५ आणि ७ सप्टेंबर २०२५ रोजी नाशिकमध्ये “बंगाल फाईल्स” या ऐतिहासिक चित्रपटाच्या दोन विशेष शोजचे यशस्वी आयोजन केले. या प्रदर्शनांना नाशिककरांनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद देत जवळपास ८०० नागरिकांनी उपस्थित राहून इतिहासाच्या एका महत्त्वपूर्ण आणि वेदनादायी काळाचा अनुभव घेतला.
या चित्रपटाच्या माध्यमातून १९४७ च्या विभाजनकाळातील घटनांची कहाणी समोर आली. या चित्रपटाने दशकानुदशके गुप्त राहिलेले सत्य उलगडून काढले आहे, तसेच विस्मृतीत गेलेल्या सत्यकथांचे महत्त्व अधोरेखित केले आणि जनतेसमोर आणले. अनेकांनी हा अनुभव “डोळे उघडणारा” व “पिढ्यान्पिढ्या सांगण्यासारखा” असल्याचे देखिल चित्रपट संपल्यानंतर नमूद केले.
कार्यक्रम संपल्यानंतर, फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. सागर मटाले यांनी मनोगत व्यक्त करत सांगितले की, “इतिहास केवळ पुस्तकांमध्ये किंवा दस्तावेजांमध्ये जतन करण्यापुरता नसून तो आपल्या स्मरणात आणि भावनांमध्येही जिवंत ठेवणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे आपण पुढील पिढीपर्यंत भूतकाळाची खरी बाजू पोहोचवू शकतो. यामुळे देशभक्तीची जाणीव, सामाजिक एकात्मता आणि सामायिक वारशाचा अभिमान निर्माण होतो जो आजच्या पिढीसाठी गरजेचा विषय आहे. युनायटेड वी स्टॅंड फाऊंडेशन भविष्यातही असे चित्रपट प्रदर्शित होताच त्यांचे आयोजन नाशिककरांसाठी करत राहील असेही सांगितले.
प्रेक्षकांनीही आपले मत व्यक्त करताना संस्थेच्या या प्रयत्नाचे मनःपूर्वक कौतुक केले. “इतिहास समजून घेण्याची ही एक वेगळी संधी आहे, जी केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नसून विचार करायला भाग पाडणारी आहे,” असे मत अनेकांनी मांडले. काही प्रेक्षकांनी अशा प्रकारच्या शोज ग्रामीण भागात, शाळा-कॉलेजांमध्ये आणि युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
या उपक्रमामुळे नाशिक शहरात केवळ एक चित्रपट प्रदर्शन न होता, इतिहासाच्या संवेदनशील टप्प्यावर समाजात विचारमंथनाचे व्यासपीठ निर्माण झाले. युनायटेड वी स्टॅंड फाऊंडेशनने पुन्हा एकदा सिद्ध केले की समाजाभिमुख उपक्रमांद्वारे ते सामाजिक जबाबदारी पार पाडत आहेत आणि नागरिकांना भूतकाळाशी जोडण्याचे काम करीत आहेत.