नवी दिल्ली – पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्राचारातून काँग्रेसने पूर्ण माघार घेतली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बंगालमध्ये प्रचार करणार नसल्याचे जाहीर केले होते. राहुल गांधी स्वतः कोरोना बाधित झाले आहेत. आता पुढील दोन महत्त्वाच्या टप्प्यात मतदान बाकी असताना कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावत असल्याने काँग्रेसने प्रचारातून पूर्ण माघार घ्यायचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा तथा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दूरध्वनीवर चर्चा केली. त्यानंतर काँग्रेसने निवडणूक प्रचारातून माघार घेतल्याचे बोलले जात आहे. पश्चिम बंगालमघ्ये सहाव्या टप्प्यातील ४३ जागांसाठी मतदान होत आहे. आणखी दोन टप्प्यात ६९ जागांसाठी मतदान होणे बाकी आहे.
सहाव्या टप्प्यातील मतदान सुरू
बंगालमध्ये गुरुवारी (२२ एप्रिल) सहाव्या टप्प्यातील ४३ जागांसाठी मतदानाला शांततेत सुरुवात झाली आहे. ४३ मतदारसंघात एकूण ३०६ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसदरम्यान मुख्य लढत रंगणार आहे. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकूल रॉय, राहुल सिन्हा यांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. तर तृणमूलच्या ज्योतिप्रिय मलिक, राज चक्रवर्ती, चंद्रिमा भट्टाचार्य, कौसानी मुखर्जी यासुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.