विशेष प्रतिनिधी, मुंबई
वांद्रे पूर्व भागातील शिवसेनेच्या भव्य लसीकरण उत्सवात लस कमी आणि पोस्टर जास्त दिसत आहेत, अशी टीका काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी करत शिवसेनेवर पुन्हा निशाणा साधला आहे. त्यापूर्वी वांद्रे पूर्व भागातील लसीकरण केंद्राच्या उद्घाटनावरून त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. लसीकरणावरून रंगलेल्या राजकारणामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
वांद्रे पूर्व भागात होणार्या भव्य लसीकरण उत्सवात शिवसेनेच्या पर्सलन पार्टी फंडाद्वारे लस विकत घेतल्या आहेत का? कारण मला कुठेही महाविकास आघाडीचा उल्लेख दिसत नाही. लसीकरण केंद्रांच्या उद्घाटनचे उदात्तीकरण थांबवला, हे आपले कर्तव्यच आहे. अशा शब्दात झिशान सिद्दीकी यांनी टीका केली आहे. आमदार सिद्दीकी यांनी आपल्या ट्विटर हँडलवर तीन-चार पोस्टरचे फोटो शेअर केले आहेत.
वांद्र पूर्वमधील लसीकरण केंद्राचे उद्घाटन परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आले होते. या कार्यक्रमात डावलल्यामुळे काँग्रेसचे आमदरार झिशान सिद्दीकी यांनी नाराजी व्यक्त केली होती. माझ्या मतदारसंघात लसीकरण केंद्राचे उद्घाटन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आले. स्थानिक आमदार या नात्याने मला का बोलावण्यात आले नाही? आपणही लसीकरणाबाबत राजकारण करणार आहात का? असा सवाल आमदार सिद्दीकी यांनी शिवसेनेला विचारला होता.
दरम्यान, मुंबई महापालिकेकडून प्रत्येक प्रभागात लसीकरण केंद्र सुरू करण्यात येत आहे. मला प्रभाग अधिकार्यांचा फोन आला होता. लेखी निमंत्रण नव्हते. पण लसीकरण केंद्र घराबाहेर असल्यामुळे मी उद्घाटन केले. स्थानिक आमदारांच्या हस्ते उद्घाटन व्हायला हवे, मी या मताचा आहे, असे परब म्हणाले होते. हा एका प्रभागाचा कार्यक्रम होता, विधानसभेचा नाही. तरीही सिद्दीकी यांना निमंत्रण द्यायला हवे होते, असे स्पष्टीकरण परब यांनी दिले आहे.
https://twitter.com/zeeshan_iyc/status/1392824577969909763