मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सर्व व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असलेला पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून सदर प्रस्तावित २७ ऑगस्टचा बंद मागे घ्यावा अशी विनंती केली. त्यानंतर हा बंद तूर्त स्थगित करण्यात आला.
व्यापा-यांचा हा बंद मार्केट ऍक्ट, जीएसटी तसेच आवेष्टित वस्तू नियम अशा कायद्यासंदर्भातील समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अन्नधान्या आदी व तत्सम कृषी वस्तूंशी निगडित समस्यांबाबत होता. त्यानंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृह येथे ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली. यात व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या यावर पुढील एक महिन्यात सोडविल्या जातील असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने सदर २७ ऑगस्ट २०२४ चा बंद हा स्थगित करणार असल्याचे नमूद केले. यासाठी सदर समस्या दूर करण्याच्या दृष्टीने एका उच्च समितीचे गठन करण्यात आले आहे. त्या समितीवर व्यापाऱ्यांचे प्रतिनिधीही घेण्यात आले असून या समितीने आपला अहवाल एक महिन्याच्या आत द्यावा असे ठरले आहे. त्याचप्रमाणे जीएसटी सारख्या विषयाबाबत किंवा अन्य कायदेशीर प्रश्नांबाबत विचारार्थ वेगळी समिती नेमण्याचेही ठरले आहे. व्यापाऱ्यांच्या या महत्वाच्या समस्या सोडवल्या जाव्यात या दृष्टीने कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, उद्योगमंत्री उदय सामंत, नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार श्रीमती माधुरीताई मिसाळ यांनी देखील विशेष लक्ष घातले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी हा बंद मागे घ्यावा असे आवाहन केल्यावर आणि या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने आवश्यक अशी समिती गठीत केल्यामुळे २७ ऑगस्ट २०२४ चा व्यापारी बंद तात्पुरता स्थगित केला आहे अशी माहिती महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य कृती समितीचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र चेंबर, ग्रोमा, फॅम, कॅट व पूना मर्चंट चेंबरचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बंदच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील सर्व संबंधित व्यापारी संघटना तसेच कृषी उत्पादनाशी निगडित इतरही व्यवसाय संघटनांनी दिलेल्या सहकार्याबद्दल ललित गांधी यांनी राज्य कृती समितीच्या वतीने आभार मानले. सदर बंदमध्ये उत्तर महाराष्ट्रातील ५० हुन अधिक संघटना या उत्स्फूर्तपणे सहभागी होणार असल्यासंबंधी पत्र चेंबरला प्राप्त झाले होते. तरी उत्तर महाराष्ट्रातील सर्व व्यापार व उद्योग हे नियमितपणे चालू ठेवावे असे आवाहन उपाध्यक्ष संजय सोनवणे, सौ. संगिता पाटील यांनी केले आहे.