जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांसाठी जळगाव येथे विभागीय आयुक्त कार्यालय स्थापन करण्यात येईल. तसेच केळी विकास महामंडळासाठी १०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात येईल. त्याचबरोबर बोदवड उपसा सिंचन योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येईल, अशा जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केल्या. जळगाव शहर खड्डेमुक्त करण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांना गती दिली जाईल. अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी त्यांच्या भाषणात मागणी केलेल्या बाबींवर मुख्यमंत्र्यांनी यावेळी या घोषणा केल्या.
पोलीस कवायत मैदान येथे ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात शासकीय योजनांच्या लाभांचे लाभार्थ्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, वैद्यकीय शिक्षण, ग्रामविकास, क्रीडामंत्री गिरीष महाजन, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष महाजन, आमदार सर्वश्री चिमणराव पाटील, आ.सुरेश भोळे, आ.किशोर पाटील, आ.संजय सावकारे आ.लता सोनवणे, आ.चंद्रकांत पाटील, आ.मंगेश चव्हाण, माजी आमदार स्मिता वाघ, चंदुलाल पटेल, शिरीष चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.
‘शासन आपल्या दारी’ अभियानात जळगाव जिल्ह्यात 3 लाख ३ हजारपेक्षा अधिक नागरिकांना लाभ देण्यात आला आहे. यापैकी ३५ हजार लाभार्थी आज येथे उपस्थित आहेत. असे नमूद करून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मागील एक वर्षात शासनाने सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. सततच्या पावसामुळे झालेले नुकसान नैसर्गिक आपत्ती म्हणून धरले. शेतकऱ्यांना १५०० कोटी रूपयांची नुकसान भरपाई दिली. नैसर्गिक आपत्तीसाठी आतापर्यंत सरकारने शेतकऱ्यांना १२ हजार कोटींची मदत केली आहे. एक रूपयात पीक विमाचा निर्णय घेतला. नियमित कर्जफेड करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला ५० हजार रूपये प्रोत्साहन रक्कम दिली. महिला सक्षमीकरणासाठी, सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल करण्यासाठी शासन निर्णय घेत आहेत. लेक लाडकी लखपती योजना सुरू केली. शासकीय योजनांचा लाभ घेऊन सरपंचांनी आपले गाव स्वच्छ व समृद्ध करण्याचे आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, सर्वाधिक पायाभूत सुविधा निर्माण करणारे महाराष्ट्र देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. परदेशी गुंतवणुकीत राज्याने आघाडी घेतली आहे. १ लाख १८ हजार कोटी रूपयांची परदेशी गुंतवणूक राज्यात मागील वर्षभरात झाली आहे. राज्यातील सर्व साडेबारा कोटी नागरिकांना आता महात्मा फुले जन आरोग्य योजनेत ५ लाखांपर्यंतचा मोफत उपचार केला जाणार आहे.
जिल्ह्यातील प्रकल्पांना गती दिली जाईल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जळगाव जिल्ह्यातील निम्न तापी पाडळसे प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. बोदवड उपसा सिंचन योजनेचे बाकी राहिलेले २० टक्के काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांना गती देण्यात येईल. सिंचनासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, मागील वर्षभरात जिल्ह्यात २० हजार हेक्टर शेती क्षेत्रावर ठिंबक सिंचनाचा लाभ देण्यात आला. याचा २१ हजार शेतकऱ्यांना लाभ झाला. ५० हजार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ देण्यात आला. १ हजार ट्रॅक्टर वाटप करण्यात आले. रस्ते कामांकरिता जिल्ह्याला अडीच हजार कोटींची मदत शासनाने केली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कांदा चाळ जळगाव जिल्ह्यात उभारण्यात आल्या. जलजीवन मिशनच्या १३५४ योजना जिल्ह्यात सुरू आहेत. फळबाग योजना व नैसर्गिक आपत्तीत जळगाव जिल्ह्याला भरघोस मदत करण्यात आल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी ४७ कोटींची मदत दिली आहे. जलजीवन मिशनच्या १७६५ कोटींच्या योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. मुक्ताईनगर मध्ये १८५ कोटींचा पूल मंजूर केला आहे. चोपडा पूला करिता १७५ कोटींची शासन मदत झाली आहे. सर्व सामान्यांच्या हितासाठी शासन योजना गतिमान पद्धतीने राबवित आहे.
वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन म्हणाले, या शासनाने जिल्ह्यात मेहरूण येथे १२४ कोटींचे नवीन अद्यावत क्रीडा संकुल मंजूर केले आहे. अत्याधुनिक मेडिकल हब जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे. सर्वसामान्यांना शासकीय कार्यालयाच्या चकरा माराव्या लागू नये यासाठी शासनाने शासन आपल्या दारी लोकाभिमुख अभियान आणले आहे. यात दुर्गम, पाड्या-वस्त्यावरील लाभार्थ्यांला शासकीय योजनांचा लाभ घरबसल्या मिळत आहे.
यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत शासनाच्या विविध योजनांच्या १५ लाभार्थ्यांना व्यासपीठावर बसण्याची संधी मिळाली. यामध्ये लताबाई पाटील, शशिकांत कोळी, अथर्व साळुंखे, दिपक भिल, गोमा गायकवाड, नीता पाटील, हिलाल बिल, मधुकर धनगर, मोहिनी चौधरी, सोनी गवळे, दत्तात्रय महाजन, विजया देवरे, ज्ञानेश्वर आमले, कु. सायली शिरसाठ, मिलिंद निकम यांचा समावेश होता. यातील प्रातिनिधिक पाच लाभार्थ्यांचा लाभाचे प्रमाणपत्र व धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा वार्षिक योजनेतून यावेळी दहा रूग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी जळगाव जिल्ह्याने विविध योजनांच्या माध्यमातून दिलेल्या लाभांची माहिती देणारी दृकश्राव्य चित्रफित दाखविण्यात आले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे खान्देशी टोपी, रूमाल, केळीपासून तयार करण्यात आलेल्या विविध वस्तु, तृणधान्याचा संच व बहिणाबाईंच्या कवितांचे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. व्यासपीठावर याप्रसंगी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, महानगरपालिका आयुक्त विद्या गायकवाड आदी अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी केले. तर उपस्थितांचे आभार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ आशिया यांनी मानले.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषी आणि कामगार विभागाच्या लाभार्थीना कामगार किट, टॅक्टरचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यातून आलेल्या सरपंचाशी ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यासपीठावरून खाली येत प्रत्यक्ष संवाद साधला.
मुख्यमंत्र्यांनी केले हार्वेस्टिंग मशीनचे सारथ्य
जिल्हास्तरीय कार्यक्रमाच्या समारोपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः व्यासपीठावर खाली येऊन शेतकऱ्यांना पॉवर टिलर वाटप करण्यासाठी गेले. त्याठिकाणी त्यांना महाडीबीटी योजनेत एका लाभार्थ्यांला मिळालेले हार्वेस्टिंग मशीन दिसले. मुख्यमंत्री स्वतः या मशीनवर चढले आणि त्यांनी मशीनचे सारथ्य केले. त्यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, आमदार किशोर पाटील, मंगेश चव्हाण हे ही हार्वेस्टिंग मशीनवर सोबत उपस्थित होते.
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी, मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे डॉ. अमोल शिंदे यांनी शासन आपल्या दारी योजनेची माहिती दिली. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा जनकल्याण कक्ष सुरु करण्यात आले आहेत. यामाध्यमातून जनकल्याण योजनांचा सर्वसामान्यांना लाभ दिला जात आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
एका छताखाली २५ शासकीय विभागाच्या माहितीचे स्टॉल
शासन आपल्या दारी अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात विविध शासकीय विभागांचे २५ स्टॉल उभारण्यात आले होते. या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती एकाच छताखाली मिळत मिळाल्यामुळे या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या माध्यमातून नागरिकांच्या लेखी समस्या, तक्रारी, निवेदने स्वीकारण्यात आली. जिल्हा सामान्य प्रशासन रूग्णालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरासही या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाअगोदर स्थानिक कलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. रोजगार मेळाव्यात एकूण 1335 युवकांनी नोंदणी केली. यापैकी 1074 युवकांची प्राथमिक निवड करण्यात आली तर 46 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या मेळाव्यात 12 विविध आस्थापना सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अपूर्वा वाणी केले.