नवी दिल्ली – दिवाळी आणि फटाके यांचे अतुट नाते आहे. त्यामुळे फटाक्यांच्या वापरावर पूर्णपणे बंदी नाही, फक्त वायु आणि ध्वनी प्रदुषण करणाऱ्या फटाक्यांना बंदी आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. दिवाळी सणाच्या नावाखाली बंदी असलेल्या फटाक्यांच्या वापरास परवानगी नाही, कारण इतरांच्या आरोग्याला धोका निर्माण करून हा उत्सव साजरा करता येणार नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
न्यायमूर्ती एम.आर. शहा आणि ए.एस. बोपण्णा यांच्या खंडपीठाने सांगितले की, इतरांच्या आरोग्याच्या किंमतीवर हा सण साजरा केला जाऊ शकत नाही. त्यांनी असे म्हटले आहे की, उत्सवाच्या नावाखाली भारतीय संविधानाच्या कलम 21 नुसार इतरांच्या आरोग्याच्या अधिकाराचे उल्लंघन करण्याची परवानगी कोणालाही दिली जाऊ शकत नाही.
आवाजी फटक्यांनी ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुले यांना खूपच त्रास होतो काही फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वायू आणि ध्वनी प्रदूषण होते त्यामुळे कोणालाही इतरांचे, विशेषत: लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या जीवाशी खेळण्यास परवानगी दिली नाही पाहिजे. त्यामुळे अशा फटक्यांच्या खेळण्यास परवानगी दिली जाऊ शकत नाही.
मात्र सर्वच फटाक्यांच्या वापरावर पूर्णपणे बंदी नसल्याचे स्पष्ट केले आहे. केवळ काही विशिष्ठ प्रकारच्या फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे जे आरोग्यास हानीकारक आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत, विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम करणारे फटाके होय.
न्यायालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना बंदी घातलेल्या फटाक्यांच्या उत्पादन, वापर आणि विक्रीबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्देशांबाबत नागरिकांना जागरूक करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक-प्रिंट मीडिया आणि स्थानिक केबल सेवांद्वारे योग्य प्रचार करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या फटाक्यांच्या बंदीचे उल्लंघन झाल्यास मुख्य सचिव, सचिव (गृह), पोलिस आयुक्त, जिल्हा पोलिस अधीक्षक, पोलिस स्टेशनचे प्रभारी वैयक्तिकरित्या जबाबदार असतील, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.