नवी दिल्ली – ‘राजा बोले दल हाले’ अशी एक म्हण आहे. म्हणजेच राजा बोले जनता डोले असा प्रकार पूर्वीच्या काळी राजेशाहीत होता. कारण कोणत्याही राजाने जनतेला आदेश दिल्यावर त्याप्रमाणे त्याचे पालन करण्याची सक्ती जनतेवर असे. आधुनिक काळात मात्र जगभरातील अनेक देशांमध्ये लोकशाही तसेच अध्यक्षीय शासन पद्धती आली असून आता जनता हीच सार्वभौम मानले जाते. परंतु अद्यापही काही देशांमध्ये तेथील शासनकर्ते किंवा हुकूमशहा हे जनतेवर निर्बंध लादतात. त्यामुळे जनतेला त्या आदेशाचे पालन करावे लागते. काहीवेळा तर हे राज्यकर्ते अजब कायदा किंवा आदेश (फतवा) काढून त्याच्या अंमलबजावणीचा हुकुम सोडतात.
उत्तर कोरिया हा असाच एक देश जेथे एक हुकुमशाही शासक असून तेथील जनता गेली कित्येक वर्ष जणू पारतंत्र्यात असल्याप्रमाणे राहत आहे. विशेष म्हणजे तेथील जनतेला इंटरनेट आणि चित्रपट पाहण्यावर बंदी आहे, विशेष म्हणजे सरकारविरोधात बोलण्याची देखील परवानगी नाही. आता या जनतेवर आणखी एक जुलमी आदेश लादण्यात आला आहे. तो आदेश म्हणजे आवडते कपडे घालण्याच्या स्वातंत्र्यावर बंदी होय. कारण आता उत्तर कोरियातील नागरिकांना लेदर जॅकेट घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे, इतकेच नव्हे यापुढे उत्तर कोरियामध्ये कुठल्याही प्रकारचे लेदरचे जॅकेट विकले जाणार नाही, तसेच कुणाला खरेदी करता येणार नाही. त्याचप्रमाणे लेदर जॅकेट जवळ ठेवणे देखील गुन्हा मानला जाणार आहे.
गेल्या काही वर्षात उत्तर कोरियात लेदर जॅकट घालण्याची मोठी फॅशन आली होती आणि हे जॅकेट चीनमधून आयात होत होते. मात्र, जॅकेटची मागणी वाढलेली पाहून आता किम सरकारने यावर बंदी आणली आहे. पण यामागे एक वेगळे कारणही देखील सांगण्यात येत आहे. ते म्हणजे, उत्तर कोरियाचा शासक किम जोंग उन सन २०१९ एका कार्यक्रमादरम्यान एक आकर्षक लेदर कोट घालून आला होता. तेव्हा देशातील जनतेला काळ्या लेदर जॅकेटमध्ये किमला पाहून थोडे कौतुकही वाटले. पण मुख्य म्हणजे अनेकांना त्याचा हा काळा लेदर कोट आवडला होता म्हणून अनेक नागरिकांनी या कोटची खरेदी सुरु केली, त्यांचे पाहून हळूहळू संपूर्ण देशातील नागरिकांमध्ये जणू काही काळा लेडर कोट घालण्याची फॅशनच आली होती. त्यामुळे एकाएकी उत्तर कोरियाच्या बाजारात या कोटची मागणी वाढली, चीनमधून हे कोट आयात होऊ लागले.
किमच्या निकटवर्तीयांना ही गोष्ट का समजली आणि त्यांनी किमचे कान भरले म्हणा ! किंवा खुद्द किमलाच ही गोष्ट कळली म्हणा ! कारण त्याने चक्क जनतेवर लेदरचा काळा कोट घालण्यावर बंदी घातली आहे. कारण जे कपडे तो घालतो आता तसेच जनता कपडे घालून राजाची बरोबरी करत असेल, तर ते राजाला थोडीच पटणार, आणि मग काय आदेश निघाला, आणि आता काळा कोट जनतेसाठी कायमचा बंद झाला आहे. आता हा नियम लागू झाल्यापासून सर्वांनी तो मान्य केला. मात्र या निर्णयामुळे येथील नागरिक खूप निराश झाले आहेत, कारण त्यांना ते फॅशनेबल कपडे घालायला आवडतात. पण आता इथले लोक असे कोट घालत नाहीत आणि कोणी विकतही नाहीत.
आता किम सरकारने फतवा काढला आहे. त्यात म्हटले आहे की, जनतेने काळा कोट घालणे ही किम जोंग उनची बरोबरी करण्यासारखे आहे, एक प्रकारे हा त्यांचा अपमान आहे, त्यामुळे जनतेने काळा कोट घालू नये, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.
वास्तविक किम सारख्या विचित्र हुकूमशाहाची बरोबरी होऊच शकत नाही. मात्र किमला हे थोडीच मान्य होणार आहे.