नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : संपूर्ण भारतामध्ये मराठी बालरंगभूमीची समृध्द परंपरा असून, मराठी बालनाट्यालाही ६६ वर्षांची समृध्द परंपरा लाभली आहे. मराठी बालनाट्यांचे सर्वात जास्त प्रयोग महाराष्ट्रात होत असतात. २ ऑगस्ट १९५९ रोजी पहिल्या व्यावसायिक बालनाट्याचा प्रयोग झाला म्हणून बालरंगभूमी परिषदेतर्फे २ ऑगस्ट हा ‘मराठी बालनाट्य दिवस’ म्हणून साजरा करणार असल्याची माहिती बालरंगभूमी परिषद नाशिक शाखेच्या अध्यक्षा डॉ. आदिती मोराणकर यांनी दिली आहे.
बालरंगभूमी परिषद ही अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेशी संलग्न संस्था असून, या संस्थेतर्फे महाराष्ट्रातील सर्व शाखांमध्ये मराठी बालनाट्य दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. मराठी बालनाट्य दिवसानिमित्त बालरंगभूमी परिषद नाशिक शाखेतर्फे ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ यांच्या सहकार्याने नाट्य छटा व नृत्य सादरीकरण या उपक्रमांचे आयोजन केले असून, या उपक्रमाला शहरातील बालकलावंत, पालक, शिक्षक व बालप्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन बालरंगभूमी परिषद नाशिक शाखेचे पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.
का साजरा केला जातो मराठी बालनाट्य दिवस
रत्नाकर मतकरी लिखित व सुधा करमरकर दिग्दर्शित ‘मधुमंजिरी’ या बालनाट्याचा पहिला प्रयोग २ ऑगस्ट १९५९ रोजी झाला होता. इथूनच मराठी रंगभूमीवर बालनाट्याच्या पर्वाला सुरुवात झाली. रत्नाकर मतकरींप्रमाणेच सुधा करमरकर यांचेही ‘मधुमंजिरी’ हे पहिलेच बालनाट्य होते. तिकीट विक्री करून साहित्य संघात झालेले ते पहिले व्यावसायिक बालनाट्य होते. या नाटकाच्या निमित्ताने सुधा करमरकर यांच्या लिटिल थिएटर या संस्थेचीही स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे मराठी रंगभूमीवरील पहिले बालनाट्य, या बालनाट्याचा पहिला व्यावसायिक प्रयोग आणि लिटिल थिएटर या संस्थेची स्थापना या त्रिवेणी योगावर शिक्कामोर्तब करत बालरंगभूमी परिषदेकडून २ ऑगस्ट हा दिवस ‘मराठी बालनाट्य दिवस’ म्हणून जाहीर करण्यात येवून, विविध उपक्रमांच्या माध्यमातून बालकलाकारांच्या हक्काचा दिवस म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो.