पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बालभारतीच्या पाठ्यपुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच यात अनेक प्रतीकांचा उपयोग करण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रतीके पाहूनच विदयार्थ्यांना कोणती कृती करावयाची आहे याचा बोध होऊ शकतो. याबाबतची माहिती याच्या सुरुवातीच्या भागातच देण्यात आलेली आहे. विदयार्थ्यांच्या विचारांना आणि कल्पनांना चालना मिळणार आहे त्यामुळे इयत्ता पहिलीपासूनच विदयार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार, विश्लेषणात्मक विचार, तार्किक विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन इत्यादी विकसित होण्यास मदत होणार आहे. याचे एकूण चार भाग असून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक आहे. विदयार्थ्यांना एकावेळी एकाच भागाच्या पाठ्यपुस्तकाचे अध्ययन करायचे असल्याने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार आहे. विशेष म्हणजे या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने जोडल्याने मुलांना आता शाळांमध्ये वह्या नेण्याची गरज राहणार नाही. परंतु नवीन पाठ्यपुस्तकांची पाने व्यवस्थित बाइंडिंग केलेली नसल्याने ती निघू लागली आहेत. त्यामुळेच पाठ्यपुस्तक मंडळांनी ती अशी पाठ्यपुस्तके परत मागविण्याचा निर्णय घेतला आहे.
शाळांना आवाहन
आपण सर्वानीच बालपणापासून बालभारतीच्या पुस्तकांमधून शिक्षण घेतलेले आहे. बालभारती विद्यार्थ्यांसाठी अनेक विषयांवर अभ्यासक्रमातील पुस्तके बनवण्याचे काम सुरू असते. त्यात वेळोवेळी योग्य ते बदलही करण्यात येतात. असाच एक बदल यंदा करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना दप्तराचे ओझे जास्त होऊ नये म्हणून यंदा पुस्तकांसोबतच वह्यांची पानेही जोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसा प्रयोग करण्यात देखील आला आहे. मात्र आता ही पुस्तके बालभारती परत घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भात बालभारतीकडून शाळांना तसे आवाहनच करण्यात आले आहे. बाल भारती कडून मोफत दिली गेलेली पाठ्यपुस्तकांची पाने सुटत किंवा निघून ( निखळून ) जात असल्याची चर्चा आहे.
सरसकट बदलून मिळणार नाही
ज्या पाठयपुस्तकांची पाने सुटली असतील त्या शाळांनी पुस्तके परत करावीत, त्या ऐवजी त्यांना नवीन पुस्तके दिली जातील, असे आवाहन बालभारतीकडून शाळांना करण्यात आले आहे. परंतु याबाबतचे मेसेज फिरत असून त्याची चर्चा होत असली तरी प्रत्यक्षात मात्र अद्याप तरी कोणत्याही शाळेकडून यासंबंधीची तक्रार आली नाही, असे स्पष्टीकरण देखील बालभारतीकडून देण्यात आले आहे. खरे म्हणजे बालभारतीकडून पुस्तके बदलून देण्यात येणार असली तरी सर्वच पुस्तके सरसकट बदलून मिळणार नाही. तर याउलट ज्या पुस्तकांमध्ये आधी पासूनच मुद्रण दोष असतील किंवा पान फाटलेली असतील अशीच पुस्तके परत घेऊन त्या ऐवजी नवीन पुस्तके दिली जाणार आहेत. त्यामुळे या सूचनेची विद्यार्थी, पालक आणि शाळांनी दखल घेणे आवश्यक आहे.