नाशिक : नाशिक शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव संजय माशीलकर, खा. हेमंत गोडसे, नाशिक लोकसभा संपर्क प्रमुख जयंत साठे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने गुरुवारी नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांची भेट घेऊन चर्चा केली.
नाशिक शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव संजय मशीलकर, खा. हेमंत गोडसे, नाशिक लोकसभा संपर्क प्रमुख जयंत साठे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक लोकसभा सहसंपर्क प्रमुख काशीनाथ मेंगाळ, ग्रामीण जिल्हा प्रमुख अनिल ढीकले, भाऊलाल तांबडे, महिला आघाडी जिल्हा संघटक लक्ष्मीताई ताठे, मंगला भास्कर, महानगरप्रमुख प्रविण तिदमे, महिला आघाडी महानगरप्रमुख अस्मिता देशमाने, युवासेना जिल्हा प्रमुख योगेश मस्के, सदानंद नवले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मनपा आयुक्त आणि पोलिस आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याशी झालेल्या चर्चेत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांच्या आराखड्याबाबत चर्चा करण्यात आली. कुंभमेळ्याच्या नियोजनसाठी राज्यस्तरीय समिती तयार होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करू असे आश्वासन बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव संजय मशीलकर यांनी दिले.
शहराच्या दृष्टीने महत्वाचे नवे रिंगरोड अधिक रुंदीचे असावे, अशी सूचना खा. हेमंत गोडसे यांनी केली. शहरातील महापालिकेचे सभागृह विविध संस्था ताब्यात घेऊन देखभाल करण्यास तयार असल्याने त्यांना रेडिरेकनरने भाडे आकरण्याऐवजी सवलत द्यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. त्याला मनपा आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. बिटको आणि झाकीर हुसेन रुग्णालयातील एमआरआय मशीन लवकरच कार्यान्वित होणार असल्याचे आयुक्तांनी संगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत असलेल्या नगरविकास विभागाने तीन केडरचा आकृतीबंध मंजूर केल्याने लवकरच मेडिकल, पॅरा मेडिकल आणि अग्निशमन विभागात भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. ही भरती प्रकिया लवकर राबविण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. त्यामुळे, ६०० लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत दहीपूल ते नेहरू चौकातील रस्ता बांधकाम अयोग्य, अरुंद झाल्याने व्यापारी, नागरिक त्रस्त असल्याचे आयुक्तांना निदर्शनास आणून दिले. त्याबाबत, स्वत: लक्ष घालण्याचे आयुक्तांनी आश्वासित केले.
नासर्डी नदीला गतवैभव देऊन तिला पुन्हा नंदिनी नदीचे रूप देण्यासाठी कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी मांडली. लवकरच नदीची पाहणी करण्याचे आयुक्तांनी आश्वासित केले. पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्याशी झालेल्या भेटीत अंबड पोलिस ठाण्याचे विभाजन करून चुंचाळे, अंबड औद्योगिक वसाहतीचे स्वतंत्र पोलिस ठाण्याचा प्रस्ताव, श्रमिकनगर भागातील अवजड वाहतूक, कंटेनर, अपघातग्रस्त रस्त्यांवरील ब्लॅक स्पॉट, गुन्हेगारी अश्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या शिष्टमंडळात अॅड. श्रद्धा जोशी कुलकर्णी, प्रविण काकड, कोमल साळवे, अॅड. अक्षय कलंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते.