पुणे – आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे (वय ८१) यांचे खासगी रुग्णालयात उपचार घेत असतांना निधन झाले. गेल्या आठवड्यातच त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी वीणा, मुलगा सुनिल, संजय आणि स्नुषा व नातवंडे असा परिवार आहे. बालाजी तांबे यांनी आयुर्वेद, अध्यात्म आणि संगीतोपचार यांचा पाच दशके प्रचार व प्रसारासाठी मोठे कार्य केले. लोणावळ्याजवळील कार्ला येथील आत्मसंतूलन व्हिलेज या प्रकल्पातून त्यांनी आयुर्वेदाबद्द जनजागृती केली. या प्रकल्पात राजकीयने नेते, अभिनेते नेहमी जात असत. त्याचप्रमाणे साहित्य व कला अशा क्षेत्रातील मान्यवरांचा या प्रकल्पाला नेहमी भेटी होत असत. परदेशातील नागरीकही त्यांचे मार्गदर्शन घेत. विविध आयुर्वेदिक औषधांची संशोधन करुन त्यांनी निर्मितीही केली आहे.
ऋषीतुल्य व्यक्तिमत्वं हरपलं : उपमुख्यमंत्री अजित पवार
“आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांनी अध्यात्म, आयुर्वेद, योगोपचार, संगीतोपचारासारख्या पारंपरिक भारतीय उपचारपद्धतींचं पुनर्जीवन केलं. आयुर्वेद, योगोपचारांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय किर्ती, लोकप्रियता मिळवून दिली. आयुर्वेदाचं महत्वं घराघरात पोहचवलं. स्वयंपाकघरातल्या वस्तूंचे आयुर्वेदिक गूण गृहिणींना समजावून सांगितले. आयुर्वेदाच्या माध्यमातून निरोगी, सुदृढ, आनंदी समाज निर्माण करण्याचं फार मोठं काम त्यांनी केलं. श्री. बालाजी तांबे यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, वैद्यकीय क्षेत्रातलं ऋषीतुल्य व्यक्तिमत्वं हरपलं आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांच्या कार्याचं स्मरण करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली.
आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांना श्रद्धांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, भारताच्या पारंपरिक आयुर्वेदिक उपचारपद्धतीला आधुनिक स्वरुप देऊन समृद्ध करण्याचं काम त्यांनी केलं. आयुर्वेदाचं महत्वं सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी हजारो लेख लिहिले. दूरचित्रवाणीवरुन संवाद साधला. आयुर्वेदातील गुणकारी औषधं त्यांचा उपयोग याचं ज्ञान देशविदेशात पोहचवलं. सर्वसामान्य नागरिकांना समजावून सांगितलं. आयुर्वेदाच्या समृद्ध परंपरेचा दस्तावेज तयार करण्याचं फार मोठं काम त्यांनी केलं आहे. त्यांनी निर्माण केलेल्या दस्तावेजातून भारतीय आयुर्वेदाचं ज्ञान, महत्वं भावी पिढ्यांसाठी चिरंतन राहणार आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी बालाजी तांबे यांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण केलं.